‘प्रेमाला’ आला बहर...
By Admin | Updated: February 15, 2016 01:37 IST2016-02-15T01:37:53+5:302016-02-15T01:37:53+5:30
शुभेच्छांची देवाणघेवाण... गिफ्ट्स... चॉकलेट्स... गुलाबांचा बुके... अशा प्रेमाची अभिव्यक्ती करणाऱ्या माध्यमातून तरूणाईने ‘व्हॅलेंटाइन डे’ रविवारी मोठ्या उत्साहात साजरा केला.

‘प्रेमाला’ आला बहर...
शुभेच्छापत्र... गिफ्ट्स... चॉकलेट्सच्या माध्यमातून ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा
पिंपरी : शुभेच्छांची देवाणघेवाण... गिफ्ट्स... चॉकलेट्स... गुलाबांचा बुके... अशा प्रेमाची अभिव्यक्ती करणाऱ्या माध्यमातून तरूणाईने ‘व्हॅलेंटाइन डे’ रविवारी मोठ्या उत्साहात साजरा केला. सुटीच्या दिवसाचे औचित्य साधून लोणावळा, खंडाळा परिसरासह विविध हॉटेल, मॉल, कॉफी शॉप, चित्रपटगृहे, झेड ब्रिज आदी ठिकाणं तरूण-तरूणींच्या गर्दीने फुलून गेले होते... ‘लाजून हासणे अन् हासून ते पहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे...’ या गीताप्रमाणे ‘त्या’च्या प्रेमाला मिळालेला ‘ती’चा लडिवाळ होकार यातून त्या दोघांचा दिवस सार्थकी ठरला.
‘प्रेम’ ही खूप सुंदर भावना आहे, तिचे प्रकटीकरण करावे का नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. या निमित्ताने पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण केले जात आहे, अशा आरोळ्या ठोकणाऱ्या मंडळींकडून याला कितीही विरोध होत असला, तरी तरुणाई दर वर्षी ‘व्हॅलेंटाइन डे’ हक्काचा दिवस असल्यासारखे साजरा करते. यंदाही हा दिवस साजरा करण्याच्या तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. शहरातील विविध मॉल, हॉटेलमध्येही तरूणाईला आकर्षित करण्यासाठी सजावट करण्यात आली होती. काहींनी स्पेशल आॅफर ठेवल्याचे दिसून आले. दुपारनंतर जंगलीमहाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, कँप या भागातील रस्त्यांवर गर्दी जाणवायला सुरूवात झाली. गुलाब, चॉकलेट्स देण्याकडे तरूणाईचा कल अधिक होता. शॉपिंग करण्यासाठीही कपड्याच्या दुकानामध्ये तरुणाईची झुंबड उडाली होती. तरूणाईसाठी टाइमपास असलेले एकमेव ठिकाण म्हणजे ‘कॉफी शॉप.’ त्यामुळेच सीसीडी, बरिस्ता अशा ठिकाणी तरुणाईने हा दिवस साजरा करणे पसंत केले. व्हॉट्स अप आणि फेसबुकच्या जमान्यात शुभेच्छापत्र देण्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी ते भावनांचे काव्यरूपी संदेशवहन करणारे माध्यम ठरत असल्याने भेटवस्तूबरोबरच शुभेच्छापत्र देण्यालाही प्राधान्य देण्यात आले.
सोशल नेटवर्किंग साइट्सवर ‘व्हॅलेंटाइन’च्या शुभेच्छांचा वर्षाव
कोण म्हणतं व्हॅलेंटाइन फक्त जोडप्यांनीच साजरा करायचा असतो? मित्र-मैत्रिणीदेखील ‘व्हॅलेंटाइन’चे मेसेज एकमेकांना पाठवू शकतात... त्यामुळे व्हॉट्स अप आणि फेसबुकवर दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. प्रेमी युगलांनीही याच माध्यमांचा आधार घेत गुलाब, चॉकलेट्स, प्रेम व्यक्त करणारे संदेश याद्वारे आपले प्रेम आवडत्या व्यक्तीकडे व्यक्त केले.