भंगाराचा माल बनवतोय कोट्यधीश!
By Admin | Updated: February 15, 2016 02:41 IST2016-02-15T02:41:48+5:302016-02-15T02:41:48+5:30
कारखान्यात गुणवत्तेचे सारे निकष पार करून पक्का व चांगला माल तयार होतो... गुणवत्ता अधिकारी चांगल्या मालावर ‘रिजेक्ट’ (डिफॉल्ट) चा शिक्का मारला जातो..

भंगाराचा माल बनवतोय कोट्यधीश!
सुनील भांडवलकर, कोरेगाव भीमा
कारखान्यात गुणवत्तेचे सारे निकष पार करून पक्का व चांगला माल तयार होतो... गुणवत्ता अधिकारी चांगल्या मालावर ‘रिजेक्ट’ (डिफॉल्ट) चा शिक्का मारला जातो..तो माल क्षणात स्क्रॅप होतो...स्क्रॅपच्या टोळ्या शिताफीने तो कारखान्याच्या बाहेर काढतात... बाजारभावापेक्षा कमी किमतीत तो स्क्रॅप माल विकला जातो. या साऱ्यातील कमाई असते अक्षरश: कोट्यवधी रुपयांची...! त्यामुळेच आता भंगारातून कोट्यधीश बनण्याचा नवा मार्ग चोरट्यांना गवसू लागला आहे.
पुणे-नगर महामार्गावरील औद्योगिक वसाहतीमध्ये राजरोसपणे हा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
कारखानदार व लोकप्रतिनिधींचे लागेबंधे असल्याने या क्षेत्रात प्रचंड आर्थिक उलाढाल होते. स्क्रॅपच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनैतिक व भरमसाठ पैशामुळे या क्षेत्राकडे स्क्रॅपमाफिया व स्थानिक तरुण मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. त्यातून औद्योगिक वसाहतीत विनापरवाना हत्यारबंद टोळ्या निर्माण झाल्या आहेत.
पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा, सणसवाडी , शिक्रापूर, रांजणगाव, कोरेगाव, ढोकसांगवी या औद्योगिक क्षेत्रामध्ये १५०० पेक्षा जास्त लहान-मोठे औद्योगिक कारखाने असून, या कारखान्यातून दरमहा लाखो टन स्क्रॅप निघत असते. यामधून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. यामध्ये कारखान्यातील व्यवस्थापन व स्क्रॅप ठेकेदार यांच्याच संगनमताने या नव्या माध्यमातून चांगला माल स्क्रॅप करून, कोट्यवधींची माया जमवली जात आहे. कारखान्यातून पक्का माल ज्या वाहनातून बाहेर काढला जातो, त्या वाहनामध्ये कमी माल भरून ते वाहन जाणीवपूर्वक चोरीला गेल्याचा बनावही अनेकदा केला जातो. काहीवेळा पोलीस यंत्रणाही गुन्हा दाखल करताना चार्जशिटमध्ये जाणीवपूर्वक उणिवा ठेवतात. चोरी गेलेल्या मालाचा विमा उतरिवलेला असल्याने चोरी गेलेल्या मालाची किंमत कारखानदाराला विम्यातून मिळत असते. त्यामुळे कारखानदारही याकडे दुर्लक्ष करतात.
आता तर लोकप्रतिनिधींमध्येच भंगाराच्या व्यवसायात स्पर्धा निर्माण झाली आहे. झटपट पैसा मिळाल्याने अल्पावधीत त्यांच्या राहणीमानातही बदल झाला आहे.