प्रतिरूप मतमोजणीला स्थगिती;विधानसभा मतमोजणीवर हरकत घेतलेल्या ८ जिल्ह्यांतील ११ मतदारसंघांचा समावेश

By नितीन चौधरी | Updated: March 1, 2025 09:49 IST2025-03-01T09:49:16+5:302025-03-01T09:49:48+5:30

राज्यातील शिल्लक राहिलेल्या प्रतिरूप मतमोजणीवर स्थगिती दिली आहे.

Postponement of duplicate vote counting; 11 constituencies from 8 districts that objected to the assembly vote counting are included | प्रतिरूप मतमोजणीला स्थगिती;विधानसभा मतमोजणीवर हरकत घेतलेल्या ८ जिल्ह्यांतील ११ मतदारसंघांचा समावेश

प्रतिरूप मतमोजणीला स्थगिती;विधानसभा मतमोजणीवर हरकत घेतलेल्या ८ जिल्ह्यांतील ११ मतदारसंघांचा समावेश

पुणे : विधानसभा निवडणुकीत मतमोजणीवर हरकत घेतलेल्या मतदारसंघांमध्ये होणारी प्रतिरूप मतमोजणी आता स्थगित करण्यात आली आहे. या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून कळविले आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेनुसार आयोगाने हा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत केवळ मुंबई उपनगर जिल्ह्यातील एका मतदारसंघातच ही प्रतिरूप मोजणी झाली आहे. राज्यातील ८ जिल्ह्यांमधील ११ मतदारसंघांमध्ये ही प्रतिरूप मतमोजणी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीनंतर ३१ जिल्ह्यांमधील ९५ मतदारसंघातील १०४ पराभूत उमेदवारांनी मतमोजणी यंत्राची फेरपडताळणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज केले होते. त्यातील काही उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल केल्या होत्या. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार न्यायालयात दाखल झालेल्या याचिका संदर्भात न्यायालयाच्या निकालानंतरच मतमोजणी यंत्राची फेरपडताळणी अर्थात प्रतिरूप मतमोजणी घेण्यात येणार होती. मात्र, ज्या मतदारसंघांमध्ये हरकती घेण्यात आल्या व न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली नाही, अशा मतदारसंघांमध्ये प्रतिरूप मतमोजणीसाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून केंद्रीय निवडणूक आयोग तसेच भारत इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीकडे माहिती पुरविण्यात आली होती. त्यानंतर कंपनीकडून एक वेळापत्रक तयार केले जाणार होते. त्यानुसार ही प्रति रूप मतमोजणी होणार होती.

मात्र, आता सर्वोच्च न्यायालयात मतमोजणी यंत्रांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील शिल्लक राहिलेल्या प्रतिरूप मतमोजणीवर स्थगिती दिली आहे. पुढील निर्देशांपर्यंत ही प्रतिरूप मोजणी करण्यात येऊ नये, असे आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना कळविले आहे. राज्यात आतापर्यंत केवळ मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारकोप व ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम व मुरबाड या चार ठिकाणी प्रतिरुप मतमोजणी करण्यात आली आहे. तर अजुनही ठाणे, बीड, धुळे, यवतमाळ, पुणे, रायगड, कोल्हापूर आणि नाशिक या आठ जिल्ह्यांमधील ११ मतदारसंघांमधील प्रतिरुप मतमोजणी झालेली नाही. या मतमोजणीला आता स्थगिती देण्यात आली आहे. यात ठाण्यातील डोंबिवली, कोपरी पाचपाखाडी व ठाणे, बीडमधील माजलगाव, धुळ्यातील धुळे ग्रामीण, पुणे जिल्ह्यातील खडकवासला, रायगडमधील अलिबाग, कोल्हापूरमधील चंदगड व कोल्हापूर उत्तर आणि नाशिकमधील येवला मतदारसंघांचा समावेश आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर ही प्रतिरूप मोजणी करण्यात येईल. तोपर्यंत या मतदारसंघांमधील मतमोजणी यंत्रांमधील माहिती सुरक्षित ठेवण्यात येणार आहे. - एक वरिष्ठ अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय

Web Title: Postponement of duplicate vote counting; 11 constituencies from 8 districts that objected to the assembly vote counting are included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.