Porsche Accident: मुलाचा गुन्हा लपविण्याचा प्रयत्न; कोट्याधीश बाप १७ महिन्यांपासून तुरुंगात
By किरण शिंदे | Updated: December 17, 2025 15:13 IST2025-12-17T15:12:40+5:302025-12-17T15:13:08+5:30
बिल्डर विशाल अग्रवालने संपत्तीच्या जोरावर सिस्टम कशी खरेदी केली होती, हे या अपघाताच्या निमित्ताने समोर आलं होतं. दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन पोराला वाचवण्यासाठी विशाल अग्रवालने काय नाही केलं?

Porsche Accident: मुलाचा गुन्हा लपविण्याचा प्रयत्न; कोट्याधीश बाप १७ महिन्यांपासून तुरुंगात
पुणे -अपघात करणारा पोरगा मोकळा आणि कोट्याधीश रुपयांची संपत्ती असलेला बाप मात्र १७ महिन्यांपासून तुरुंगात... होय, हे अगदी खरंय... पुण्यातलं पोर्शे कार अपघात प्रकरण अजूनही सर्वांच्या लक्षात असेलच. बिल्डर विशाल अग्रवालने संपत्तीच्या जोरावर सिस्टम कशी खरेदी केली होती, हे या अपघाताच्या निमित्ताने समोर आलं होतं. दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन पोराला वाचवण्यासाठी विशाल अग्रवालने काय नाही केलं?
सुरुवातीला येरवड्यातील पोलीस मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ससून रुग्णालयात रक्ताची अदलाबदल करून आपलं पोरगं दोषी ठरणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली होती. मात्र पोलिसांच्या नजरेत त्याची ही हेराफेरी आली आणि विशाल अग्रवाल इथेच फसला.
या प्रकरणात पोलिसांनी त्याला १७ महिन्यांपूर्वी अटक केली. फक्त त्यालाच नाही, तर या प्रकरणात मदत करणारे ससून रुग्णालयाचे डॉक्टर अजय तावरे, डॉ. हळनोर आणि इतर असे नऊ जण आजही तुरुंगात आहेत. जामीन मिळावा यासाठी ते वेळोवेळी प्रयत्न करत आहेत; मात्र प्रत्येक वेळी सरकारी वकील त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडत आहेत. आईच्या आजारपणाचं कारण सांगून विशाल अग्रवालने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र विशाल अग्रवालने केलेला गुन्हा किती गंभीर आहे, हे सरकारी वकिलांनी पुन्हा एकदा कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं आणि कोर्टाने त्याचा जामीन पुन्हा फेटाळला.
मुलाला मद्यप्राशनाच्या अवस्थेत वाहन चालवण्यापासून वाचवण्यासाठी वैद्यकीय अहवालात छेडछाड केल्याचा गंभीर आरोप विशाल अग्रवाल यांच्यावर आहे. त्यामुळे न्यायालयाने जामीन नाकारत कठोर भूमिका घेतली आहे. १९ मे २०२४ रोजी पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव पोर्शे कारने दुचाकीस्वार दोघांचा जीव घेतला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात पोलिसांचीही भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली.
त्यानंतर आरोपीला मदत केल्याचा ठपका ठेवत येरवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे, अपघात करणारा अल्पवयीन पोरगा आता सज्ञान झालाय आणि तो बाहेर मस्त आयुष्य जगतोय. मात्र या पोराच्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करणारा बाप अजूनही तुरुंगात सडतोय.