Manorama Khedkar News: वादग्रस्त पूजा खेडकर यांच्या आईने नवी मुंबईतील ऐरोलीत एका ट्रकचालकाचे अपहरण केले. त्यानंतर त्याला पुण्यातील घरात डांबून ठेवले. रबाळे पोलिसांनी शोध घेतला. मनोरमा खेडकरने ट्रकचालकाचे अपहरण केल्याचे समोर आले. पण, ट्रकचालकाला घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत मनोरमा खेडकरने वाद घातला. त्यामुळे माघारी आले आणि गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस कारवाईला पोहोचले, त्यावेळी पूजा खेडकरचे आई-वडील घरातून फरार झाले. पोलीस गेटवरून उड्या मारून घरात गेले. त्यांनी परिसराची पाहणी केली.
मनोरमा खेडकरने शनिवारी रात्री (१३ सप्टेंबर) तिच्या कारला धक्का लागल्यानंतर मिक्सर ट्रक चालक प्रल्हाद कुमार याला बळजबरी कारमध्ये बसवले होते. त्यानंतर त्याला थेट पुण्यातील चतुश्रृंगी परिसरात असलेल्या घरात डांबून ठेवले होते. पोलिसांनी कारनंबरच्या साहाय्याने प्रल्हाद कुमारचा शोध घेतला आणि सुटका केली.
मनोरमा खेडकरने पोलिसांसोबत घातला वाद
ट्रकचालका सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत मनोरमा खेडकरने वाद घातला. कुत्रे अंगावर सोडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पोलीस माघारी आले. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, मनोरमा खेडकरला समन्स बजावले होते.
मनोरमा खेडकर चौकशीसाठी हजर न झाल्याने पोलीस सोमवारी दुपारी तिच्या घरी पोहोचले. त्यावेळी घराचे गेट बंद होते. पोलीस गेटवरून उड्या मारून आत गेले. तेव्हा घराचे दरवाजेही बंद होते. पोलिसांनी परिसराची पाहणी केली. घरामध्ये कुणी आहे का? याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नोटीस घरावर लावून पोलीस माघारी गेले.
ज्या कारमधून ट्रकचालकाचे अपहरण करण्यात आले, त्याच कारमधून पूजा खेडकरचे आईवडील फरार झाले आहेत. दरम्यान, पोलिसांना घराच्या बाहेर जेवण असलेले दोन डब्बे आढळून आले. घरात कुणीही नसताना जेवणाचे हे डब्बे कुणासाठी आले आहेत, असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला.