पुणे : ‘पोलिस २४ तास काम करतात. त्यांना चांगल्या सुविधा दिल्या, तर ते नागरिकांना न्याय देतील. पोलिसांना चांगल्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, पोलिसांनी सर्वसामान्यांना न्याय द्यावा,’ अशा सूचना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
पुणे पोलिसांकडून पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयाेजित केलेल्या ‘तरंग २०२५’ या सांस्कृतिक कार्यक्रमात ते बाेलत हाेते. शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांनी हिंदी- मराठीतील विविध गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक, सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुनीत बालन ग्रुपचे संचालक पुनीत बालन, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, प्रवीणकुमार पाटील, मनोज पाटील, अरविंद चावरिया यांची उपस्थिती होती. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, संदीपसिंग गिल, संदीप भाजीभाकरे यांच्यासह पुणे पोलिस दलातील चांगली कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
फडणवीस म्हणाले की, पुणे हे आंतराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे शहर आहे. विविध देशांतील नागरिक शहरात येतात. शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना राज्य शासनाकडून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. गंभीर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी ‘काॅप्स २४’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शहरात २४ तास गस्त घालण्यात येणार असून, त्यासाठी पोलिसांना वाहने उपलब्ध करून दिली असल्याचे सांगितले.
सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्र पोलिसांना विशेष क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. सायबर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी शासनाकडून पोलिसांना अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असेदेखील त्यांनी नमूद केले.
पोलिसांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही
या कार्यक्रमात शहरातील एका सराफी पेढीतून चोरीला गेलेले १७ किलो सोन्याचे दागिने सराफ व्यावसायिकाला परत करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पोलिसांना बरीच कामे असतात. कायदा सुव्यवस्था, बंदोबस्त, मोर्चा, आंदोलन, गंभीर गुन्ह्यांचा तपास करावा लागतो. नागरिकांनी त्यांचा मौल्यवान ऐवज जपावा. त्यासाठी आवश्यक त्या सुरक्षाविषयक उपायोजना कराव्यात. प्रत्येक वेळी पोलिसांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, असे मत व्यक्त केले.
सोलापूरकर प्रकरणात योग्य ती कारवाई होईल
राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत राज्य शासनाची भूमिका काय आहे, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला असता ‘या प्रकरणात शासनाने भूमिका घेण्याची गरज वाटत नाही. पोलिसांकडून या प्रकरणाची चाैकशी सुरू आहे. पोलिस योग्य ती कारवाई करतील’, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.