पुणे : नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या पुणेपोलिसांवरच हल्ले होत असल्याने पोलिसांची सुरक्षा कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोम्बिंग ऑपरेशन करून घरी परत निघालेल्या एका पोलिसाला सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात चौघा दारूड्यांनी बेदम मारहाण केली. त्यांचा मोबाइल हिसकावला. संबंधित पोलिसाने याबाबत चतुःशृंगी पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, गुन्हा दाखल करून दारूड्यांना अटक करण्याचे सोडून चतुःशृंगी पोलिसांनी एकाला मध्यस्ती करण्यास पाठवून प्रकरण मिटवून घेण्याचा सल्ला दिला.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर हा प्रकार जाताच, त्यांची चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या ठाणेदाराला चांगलेच फैलावर घेतले. अखेर घटनेच्या चार दिवसांनंतर गुन्हा दाखल केला. याबाबत चंद्रकांत जाधव (४२, रा. रामोशीवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी रूपेश मांजरेकर, अनिकेत घोडके आणि अभिजित डोंगरे या तिघांना अटक केली असून, त्यांच्या अन्य एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जाधव यांना मारहाण केल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे सहकारनगर पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. ते रामोशीवाडी एस. बी. रोड परिसरात वास्तव्यास आहेत. गुरुवारी (दि. १३) मध्यरात्री आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोम्बिंग ऑपरेशन संपवून घरी जात होते. जाधव यांच्या म्हणण्यानुसार ते रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात आले असता चार इसम त्यांना रस्त्यावर एका रिक्षात मद्य प्राशन करताना दिसले. त्यांचा रस्त्यावर राडा चालू होता. जाधव यांनी त्यांना हटकले, गोंधळ घालत असल्याचा जाब विचारला. त्या रागातून त्यांनी जाधव यांना धमकावत आम्हाला माहिती आहे तू पोलिस आहेस, परंतु तू इथला पोलिस नाहीस, त्यामुळे तू आम्हाला शिकवू नको, असे म्हणत दम भरला. त्यानंतर चौघांनी जाधव यांना रिक्षात डांबून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान आरोपी रूपेशने अनिकेत याला ‘तो दगड उचल आणि ठार मारून टाक त्या पोलिसाला,’ असे म्हणत आरोपींनी जाधव यांच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. आपली सुटका करून घेतल्यानंतर जाधव यांनी मोबाइलमध्ये आरोपींचे फोटो काढले. तो मोबाइल त्यांनी हिसकावून घेतला. तो मोबाइल अद्याप त्यांना मिळालेला नाही.
सर्वात गंभीर प्रकार म्हणजे जाधव हे पोलिस असल्याचे माहिती असतानादेखील निर्ढावलेल्या गुन्हेगारांनी त्यांना मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर जाधव यांनी ओळखीच्या चतु:शृंगी पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याला फोन करून आपल्याला मारहाण झाल्याचे सांगितले. ते सांगत असताना, सर्व प्रकार समोरील अधिकाऱ्यांना ऐकू जात होता. तरी चौघे जाधव यांना मारहाण करत होते. काही वेळानंतर चतुःशृंगी पोलिस घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत चौघे तेथून फरार झाले होते. जाधव यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करून घेण्यास सांगितले. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी, आता नको उद्या पाहू, असे म्हणत वेळ मारून घेतली. जाधव यांनी माझी तक्रार तर दाखल करून घ्या साहेब, असे म्हटल्यावर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. त्या रात्री पहाटे पाच वाजेपर्यंत ते ससून रुग्णालयात होते.
दुसऱ्या दिवशी परत जाधव चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी तेथील अधिकाऱ्यांना भेटून कैफियत मांडली. कोर्टाचे काम असल्याचे सांगून हे अधिकारी निघून गेले. जाधव तेथेच ताटकळत उभे होते. शेवटी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना त्यांना भेटवण्यात आले, त्यांनी आपल्या वरिष्ठांच्या कानावर घालतो, तसेच दोन दिवसांवर तरंग कार्यक्रम आहे, उगीच भलती भानगड नको, आपले कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. आरोपींना पकडून तुमच्यासमोर उभे करतो, असे म्हणून त्यांची बोळवण करण्यात आली. त्यानंतर तर पोलिसांची हद्दच झाली. एका व्यक्तीमार्फत जाधव यांना प्रकरण मिटवून घेण्याचा अजब सल्लाच देण्यात आला. एका पोलिस कर्मचाऱ्याला चार जण बेदम मारहाण करत असतील, ते ही पोलिस असल्याचे माहिती असताना; कारण काय तर रात्रीच्यावेळी दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ घालत असताना हटकले म्हणून. पोलिसाने तक्रार केल्यानंतरदेखील आरोपींना धडा शिकवण्याचे सोडून पोलिसच पोलिसाला वाद मिटवून घेण्याचा सल्ला देत असतील तर सर्वसामान्य नागरिकांबाबत पोलिस किती कर्तव्यदक्ष असतील, याचा विचार न केलेलाच बरा.