पोलिस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या; पुणे शहरातील घटना
By विवेक भुसे | Updated: July 7, 2023 11:19 IST2023-07-07T11:18:59+5:302023-07-07T11:19:17+5:30
टेरेसवरील झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार...

पोलिस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या; पुणे शहरातील घटना
पुणे : पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या पोलिस शिपायाने घराच्या टेरेसवरील झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैभव दिलीप शिंदे (वय २९, रा. खेरे कॉलनी, लोहगाव) असे या पोलिस शिपायाचे नाव आहे.
वैभव शिंदे यांच्या मागे आई, पत्नी कांचन, भाऊ विजय आणि चार वर्षाचा मुलगा आहे. वैभव शिंदे हे पोलीस पोलीस दलात मोटार परिवहन विभागात नियुक्तीला होते. शिंदे हे पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परिक्षेची तयारी करत होते. शिंदे यांच्या घराजवळ चिंचेचे झाड आहे. छतावर झाडाची फांदी आलेली आहे. शिंदे यांनी शुक्रवारी पहाटे या फांदीला टॉवेल बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली.
शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. या चिठ्ठीमध्ये त्यांनी पत्नी कांचन मला माफ कर. भाऊ आणि आई मला माफ करा. माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. भाऊ विजय याने पत्नीशी विवाह करावा, असे शिंदे यांनी चिठ्ठीमध्ये इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या आत्महत्येमागील निश्चित कारण अद्याप समजू शकले नाही. नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.