PMP: रस्त्याच्या मधाेमध थांबायचे असेल तर बसस्टाॅपचे काय काम? पीएमपी प्रवासात ज्येष्ठांची हेळसांडच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 02:23 PM2024-03-06T14:23:44+5:302024-03-06T14:24:02+5:30

अगदी ‘पीक अवर्स’मध्येही एसी गाड्या भरधाव वेगात पळवल्या जात असल्याने अनेकदा घाईघाईत चढणारे ज्येष्ठ, महिला धडपडतात किंवा अन्य प्रवाशांवर आदळतात. अशा एक ना अनेक कारणांमुळे डेक्कन-हडपसर पीएमपी प्रवास प्रवाशांसाठी माेठा कटकटीचा ठरत आहे....

PMPML: What is the purpose of a bus stop if you want to stop in the middle of the road? PMP journey followed by seniors | PMP: रस्त्याच्या मधाेमध थांबायचे असेल तर बसस्टाॅपचे काय काम? पीएमपी प्रवासात ज्येष्ठांची हेळसांडच

PMP: रस्त्याच्या मधाेमध थांबायचे असेल तर बसस्टाॅपचे काय काम? पीएमपी प्रवासात ज्येष्ठांची हेळसांडच

पुणे : प्रवासी चढले की नाही, याची काळजी न करता बसस्टाॅपवरून गाड्या निघून जातात, तर काही बस बसस्टाॅपऐवजी रस्त्याच्या मधाेमध थांबतात. बसमध्ये कानांत हेडफाेन घालून एकाच जागी प्रवासी थांबून राहतात, त्यामुळे पुढे चलण्यासह तिकीट लवकर घेण्यावरून वाहकांसाेबत वाद हाेतात. अगदी ‘पीक अवर्स’मध्येही एसी गाड्या भरधाव वेगात पळवल्या जात असल्याने अनेकदा घाईघाईत चढणारे ज्येष्ठ, महिला धडपडतात किंवा अन्य प्रवाशांवर आदळतात. अशा एक ना अनेक कारणांमुळे डेक्कन-हडपसर पीएमपी प्रवास प्रवाशांसाठी माेठा कटकटीचा ठरत आहे.

या मार्गावर अनेक ठिकाणी पीएमपी बसस्टाॅपचे शेडच नाहीत. शिवाय बसस्टाॅपजवळ इतर खासगी वाहनांची वर्दळ यांमुळे पीएमपी बसमध्ये चढणे अवघड ठरत आहे. विशेषत: ज्येष्ठांसाठी, महिला प्रवाशांसाठी पीएमपी बसप्रवास ही एक कसरत आहे, अशा शब्दांत काही प्रवाशांनी ‘लाेकमत’ने केलेल्या डेक्कन-हडपसर पीएमपी बस प्रवासातील पाहणीदरम्यान आपल्या भावना व्यक्त केल्या.

चालक हॉर्न मारत सुसाट

दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी डेक्कनहून हडपसरला निघालेली पीएमपीची एसी बस... ड्रायव्हरला ना सिग्नल दिसतो, ना रस्त्यावरच्या गाड्या दिसतात. जोरजोरात हॉर्न वाजवत तो बस पुढे दामटत सुटतो. रस्त्याने ये-जा करणाऱ्या व्हॅनचालकांसोबतच बसमधील प्रवाशांचीही तारांबळ उडते. वाहकाने वारंवार सांगूनही कशाचीही पर्वा न करता बसचालक मात्र त्याच्या धुंदीत गाडी चालवत असतो. सेव्हन लव्ह चाैकात काही दिवसांपूर्वी अशीच भरधाव वेगात पळणाऱ्या एसी गाडीचा अपघात हाेता-हाेता वाचला, असा अनुभव एका महिला प्रवाशाने व्यक्त केला.

ब्रेक मारला की कोणी ना कोणी पडलाच...

कशाचीही चिंता न करता सुसाट निघालेला चालक समोर गाडी आली जोरात ब्रेक मारायचा. त्याने ब्रेक मारला की बसमध्ये उभ्या असलेल्या प्रवाशांपैकी कोणी ना कोणी एक तर खाली पडायचा, नाही तर कुणाच्या अंगावर तरी पडायचा. प्रवासीच नाही तर वाहकसुद्धा २-३ वेळा डगमगला; मात्र चालक आपल्याच दुनियेत गाडी चालवण्यात मग्न होता.

...दरवाजा बंद झाला की धडकीच भरते !

एसी बसचा इलेक्ट्रिक दरवाजा बंद झाला किंवा उघडला की धडकीच भरते, असे वक्तव्य बसमधून प्रवास करणाऱ्या संतोष शिंदे (वय ६२) यांनी व्यक्त केले. अनेकदा बसच्या दारात सापडून आपला भाजीपाला होतो की काय असेच वाटते अशी मिस्कील टिप्पणी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना केली. दरवाजा बंद होण्याच्या नादात मी घाईघाईत चढतो; त्यामुळे अनेकदा पायऱ्यांमध्येच पडतो असेही त्यांनी सांगितले.

बसमध्ये चढल्यावर करावी लागते कसरत

सध्या बसमध्ये चढल्यावर डाव्या बाजूला वाटेत खांबाला पकडून उभं राहण्याची सोय असते. मात्र एसी बसमध्ये चढल्यावर डाव्या बाजूला खांबच नसल्याने प्रवाशांची कसरत होते. काही वेळा तर बसमध्ये चढताच दरवाजा बंद होऊन बस पुढे सरसावते. त्या दरम्यान आधार घेण्यासाठी खांब नसल्याने प्रवासी गडबडून खाली पडतात किंवा इतर प्रवाशांवर आदळतात.

बसमधील पायरीमुळे ज्येष्ठांना अडचणी; अनेक वेळा दुखापतीच्या घटना

एसी बसमध्ये मागील बाजूच्या सीटवर बसायचे असेल तर दोन पायऱ्या चढून मग सीटपर्यंत पोहोचावे लागते. या पायऱ्यांमध्ये अंतर जास्त असल्याने ज्येष्ठांना चढताना अनेकदा दुखापतींचा सामना करावा लागतो. त्यातच चालकाने ब्रेक मारला, तर गंभीर दुखापती होण्याची शक्यता टाळता येत नाही.

आपत्कालीन खिडकी तोडण्यासाठी हातोडीच नाही?

एसी बसमध्ये आपत्कालीन वेळ आली तर खिडकी फोडण्यासाठी हातोडा दिलेला असतो. मात्र ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीदरम्यान अनेक एसी बसमध्ये आपत्कालीन खिडकी तोडण्यासाठी हातोडाच जागेवर नसल्याचे निदर्शनास आले.

मी दरराेज हडपसरहून पीएमपीने स्वारगेटच्या दिशेने येत असते. हा मार्गावर पीक अवर्समध्ये तर माेठी वर्दळ असते. मात्र अशाही स्थितीत एसी पीएमपीच्या गाडी अतिवेगाने धावतात. बऱ्याचदा त्या बसस्टाॅपच्या जवळ न थांबता रस्त्याच्या मधाेमध थांबतात. बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थी, चाकरमानी मंडळी असल्याने कानात हेडफाेन, पाठीवर सॅक अशा अवतारात घाईघाईने बसमध्ये चढतात. शिवाय ते आपल्यातच मश्गुल असल्याने वाहकांनी पुढे चला असे कितीही सांगितले तरी जागेवरच थांबतात, परिणामी वादाचे प्रसंग उद्भवतात.

- अविधा जगताप, प्रवासी

Web Title: PMPML: What is the purpose of a bus stop if you want to stop in the middle of the road? PMP journey followed by seniors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.