लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: एकीकडे ई-बसचा वापर मोठ्या प्रमाणात होत असताना पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) ५०० सीएनजी बस भाडेतत्त्वावर घेत आहे. मात्र, या प्रक्रियेत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना डावलून काेट्यवधींचा घोटाळा झाल्याची शक्यता व्यक्त हाेत आहे.
पीएमपीएमएलच्या स्वमालकीच्या एक हजार सीएनजी बस, पीएमयू ड्राईव्हअंतर्गत एक हजार ई-बसेस ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे बसची संख्या चार हजारांवर जाणार आहे. बससंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असताना, नव्याने ईव्हीकडे न जाता, सीएनजीच्या भाडेतत्त्वावरील पाचशे बस घेण्याचा घाट कोणासाठी घातला जात आहे, असा सवाल केला जात आहे.
या सीएनजी बस प्रतिकिलोमीटर ९०.८१ रुपये दराने करार करण्याचा विचार सुरू आहे. काही महिन्यांपूर्वीच चारशे सीएनजी बसचा प्रतिकिलोमीटर ८५ रुपये दराने करार केला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएल सार्वजनिक बस वाहतूक सेवा देत आहे. पीएमपीएमएलच्या मालकीच्या सातशे बस आहेत. १,२८० बस या ठेेकेदारांच्या आहेत. पीएमपीएमएल मालकीच्या एक हजार सीएनजी बस, पीएमयू ड्राईव्ह अंतर्गत एक हजार ई-बस ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे बसची संख्या तब्बल चार हजारांवर जाणार आहे. त्यापूर्वीच पीएमपीएमएलच्या ताफ्यात पाचशे सीएनजी बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. पाच ठेकेदारांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला.
या प्रक्रियेत भाग घेतलेल्या ठेकेदारांनाच पीएमपीएमएलने यापूर्वी सीएनजीच्या चारशे बस प्रतिकिलोमीटर वाहक आणि चालकासहित ८५ रुपये दराने दिल्या होत्या. आता मात्र नव्याने सीएनजी बससाठी ९०.८१ रुपये प्रतिकिलोमीटर याप्रमाणे भाडेदर देण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे पीएमपीएमएलला काेट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे.
ईव्हीचा पर्याय स्वस्त असतानाही, सीएनजीचा महागडा पर्याय स्वीकारण्याचे कारण काय? मुख्य म्हणजे, आताच महापालिका निवडणूक झाली आहे. नवे महापौर आणि पूर्ण टीम त्याविषयी निर्णय घेईल. असे असताना ही घाई कशासाठी, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. भ्रष्टाचार-कमिशनखोरी संपवू आणि पुण्याचा विकास करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेले असताना, सरळसरळ हा गैरव्यवहार कसा होऊ शकतो?
बस भाडेकरारावर घेण्याची प्रक्रिया सुरू
पीएमपीकडून नव्याने भाडेतत्त्वावरील ५०० सीएनजी बस घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये पाच ठेकेदारांनी सहभाग घेतला आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
इलेक्ट्रिक बसची सेवा देशभरात किती स्वस्त?
शहर दर प्रति किलाेमीटर बसचा प्रकार
- सुरत ५०.९९ रुपये (९ मीटर)
- अहमदाबाद ५१.५० रुपये (९ मीटर)
- दिल्ली ५१.७० रुपये (९ मीटर)
- हैदराबाद ५४.९१ रुपये (९ मीटर)
- बंगळूरू ५५.५५ रुपये (९ मीटर)
- दिल्ली ५९.९९ रुपये (१२ मीटर)
- अहमदाबाद ६०.८० रुपये (१२ मीटर)
- बंगळूरू ६०.९४ रुपये (९ मीटर, लाे फ्लाेर एसी)
- हैदराबाद ६१.९१ रुपये (१२ मीटर, स्टँडर्ड फ्लाेर नाॅन एसी)
- हैदराबाद ६२.१० रुपये (१२ मीटर, इव्ही लाे फ्लाेर नाॅन एसी)
- बंगळूरू ६२.९२ रुपये (१२ मीटर, लाे फ्लाेर नाॅन एसी)
- हैदराबाद ६५.३८ रुपये (१२ मीटर, लाे फ्लाेर नाॅन एसी)
पीएमपीएमएल बस भाडेतत्त्वावर घेताना महत्त्वाचे घटक असलेले पुणे महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त यांना याबाबत सखोल माहिती देण्यात आलेली नाही. पीएमपीएमएल सीएनजी बस भाडेतत्त्वाच्या दराबाबत तक्रार आली असेल, तर चौकशी करावी लागेल. पीएमपीएलची संचलन तूट कोट्यवधी रुपये असताना सीएनजी बस भाडेतत्त्वावर जादा दर देणे हे परवडणारे नाही. पीएमपीएलची संचालन तूट वाढल्याचा बोजा पुणे महापालिकेवर पडत आहे.-नवल किशोर राम, आयुक्त, पुणे मनपा
शहराला एक लाख लोकसंख्येमागे ६० बसची गरज आहे. पुणे, पीसीएमसी आणि पीएमआरएडीची लोकसंख्या पाहता सहा हजार बसची आवश्यकता आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावर घेतल्या जाणाऱ्या ५०० बसशिवाय आणखी दीड हजार बसची आवश्यकता आहे. दुसरीकडे बेस्टमध्ये जीसीसी तत्त्वावर प्रतिकिलोमीटर १३५ रुपये याप्रमाणे भाडेकरार आहे. तुलनेने पुण्यात प्रतिकिलोमीटर ९० रुपये इतकाच दर आहे. पुणेकरांना चांगल्या बस सुविधा देण्यासाठी भविष्यात आणखी बस खरेदी करण्यात येणार आहेत.-पंकज देवरे, अध्यक्ष व एमडी, पीएमपी
पीएमपीएमएल सीएनजी बस भाडेतत्त्वावर घेत आहोत. पण, त्यासाठी अन्य शहरांच्या तुलनेत जादा दर आकारले जाणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला काँग्रेस पक्ष विरोध करणार आहे. सीएनजी बससाठी जादा दर आकारून ठेकेदाराचे भले केले जात आहे. जादा दराने बस घेऊन एकप्रकारे पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घातला जात आहे.-प्रशांत जगताप, नगरसेवक पुणे मनपा
पीएमपीएमएल बस भाडेतत्त्वावर जादा दराने घेण्याचे सुरू आहे. अन्य शहरांच्या तुलनेने पुण्यातच जादा दर आहेत. एकप्रकारे पुणेकरांच्या खिशांवर दरोडा टाकण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराची ही सुरुवात झाली आहे. पुणेकरांनी यासाठी भाजपला निवडून दिले आहे का?-रवींद्र धंगेकर, माजी आमदार, शिंदेसेना
Web Summary : Pune's PMPML faces corruption allegations over its CNG bus deal. Concerns arise as officials bypass due process, favoring costly CNG over cheaper EV options. Critics question the urgency and transparency of the decision, impacting Pune's finances.
Web Summary : पुणे के पीएमपीएमएल पर सीएनजी बस सौदे को लेकर भ्रष्टाचार के आरोप लगे हैं। अधिकारियों द्वारा महंगी सीएनजी को सस्ती ईवी पर तरजीह देने से चिंता बढ़ गई है। आलोचकों ने निर्णय की तात्कालिकता और पारदर्शिता पर सवाल उठाए हैं, जिससे पुणे की वित्तीय स्थिति प्रभावित हो रही है।