PMPML महामंडळाच्या कॅशलेस सुविधांमध्ये बाधा! प्रवाशांबरोबर वाहकाच्या डोक्याला ताप

By भाग्यश्री गिलडा | Published: November 5, 2023 02:04 PM2023-11-05T14:04:49+5:302023-11-05T14:05:45+5:30

प्रवाशांनी ट्रान्झॅक्शन आयडी जोडून फॉर्म भरून दिल्यावर पुढच्या ५ ते ७ दिवसात अडचणी सोडवून प्रवाशांना रिफंड दिला जातो

PMPML Corporation cashless facilities hampered Head fever of carrier with passengers | PMPML महामंडळाच्या कॅशलेस सुविधांमध्ये बाधा! प्रवाशांबरोबर वाहकाच्या डोक्याला ताप

PMPML महामंडळाच्या कॅशलेस सुविधांमध्ये बाधा! प्रवाशांबरोबर वाहकाच्या डोक्याला ताप

पुणे: पुणे परिवहन महामंडळाच्या वतीने महिनाभरापूर्वी पीएमपीच्या प्रवाशांसाठी कॅशलेस सुविधा सुरु करण्यात आल्या होत्या. या कॅशलेस सुविधा त्रुटिजन्य असल्याने प्रवाशांसहित वाहकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे. पैसे ट्रान्स्फर झाल्याचा मेसेज येऊनही मशिनमधून तिकीट बाहेर येत नसल्याने पुणेकर तक्रार करत आहेत. तर दुसरीकडे मशिनमधून तिकीट का येत नाही? हा विचार वाहकाच्या डोक्याचा ताण बनला आहे.

रेकॉर्डला ७३ तक्रारी ; रेकॉर्डवर नसणाऱ्या किती?

आतापर्यंत महामंडळाकडे एकूण ७३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत 'लोकमत'ने काही प्रवाशांसोबत संवाद साधला असता त्यांनी येणाऱ्या अडचणी सांगितल्या. यामध्ये पैसे बँकेच्या खात्यातून गेले मात्र मशिनमधून तिकीट मिळाले नाही. अशा प्रकारच्या तक्रारींचा समावेश अधिक आहे. एका प्रवासीने उल्लेख केला की पीएमपीच्या रेकॉर्डला ७३ तक्रारी त्यासोबतच वाचकांशी संवाद साधला असता तिकीट न येण्याचं कारण मशीन सांगतं पण आम्ही त्यावर काय उपाय करू शकतो हेच आम्हाला माहित नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

एका महिन्यात १ लाख ५६ हजार युपीआय ट्रान्झॅक्शन

महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात दिवसाला सरासरी ५ हजार युपीआय ट्रान्झॅक्शन करून तिकीट घेतले गेले आहेत. तर १ ऑक्टोबर २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये एकूण १ लाख ५६ हजार ७३३ युपीआय ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. त्यामध्ये महामंडळाला एकूण ४१ लाख ४५ हजार १३८ रुपये निधी प्राप्त झाला आहे.

हेल्पलाईन नंबर ? तोही अवैध!

वाहतूक नियोजन अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार कॅशलेस किंवा युपीआय पेमेंट करताना काही अडचणी आल्यास महामंडळाकडून २४५४५४५४ हा हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे. यावर संपर्क केल्यावर अडचणी सोडवण्यात येतात. मात्र प्रत्यक्षात या क्रमांकावर फोन केला असता हा नंबर अवैध आहे असे लक्षात येते.

प्रवाशांना अडचण आल्यास महामंडळाच्या मुख्यालयांमध्ये तक्रार करण्यासाठीचा फॉर्म मिळतो. प्रवाशांनी ट्रान्झॅक्शन आयडी जोडून फॉर्म भरून दिल्यावर पुढच्या ५ ते ७ दिवसात अडचणी सोडवून प्रवाशांना रिफंड दिला जातो. कॅशलेस सुविधांमध्ये प्रवाशांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महामंडळाकडून हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. त्यावर संपर्क साधला असता एसएमएसद्वारे लिंक येते. लिंकवर क्लिक करून फॉर्म भारत येतो. -विजय रांजणे, वाहतूक नियोजन अधिकारी, पीएमपीएमएल

Web Title: PMPML Corporation cashless facilities hampered Head fever of carrier with passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.