पुणे - महापालिका निवडणुकीतील जागावाटपावरून महायुतीत नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत. इच्छुक उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली. शिंदेसेनेकडून भाजपकडे २० ते २५ जागांची मागणी करण्यात आली असताना, भाजप इतक्या जागा देण्यास तयार नसल्याचे समोर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे.पुण्यातील गोखले रोड परिसरात असलेल्या नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी गर्दी करत नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे यांनी आज माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. गोऱ्हे म्हणाल्या, भाजपने आम्हाला १५ जागा देण्याची तयारी दर्शवली होती. त्या जागांवर चर्चा झाली असून पक्षाकडून आम्हाला यादीही आली आहे. मात्र, आम्हाला २५ जागा मिळाल्या पाहिजेत, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. यासंदर्भात भाजपला पत्र पाठवण्यात आले आहे.
त्या पुढे म्हणाल्या, आज शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असून या विषयावर माझी उदय सामंत यांच्याशीही चर्चा झाली आहे. जागावाटपाबाबत अंतिम टप्प्यात चर्चा सुरू आहे. शिंदेसेनेचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे नाराज असल्याच्या चर्चांबाबत विचारले असता गोऱ्हे म्हणाल्या, नाना भानगिरे यांना एक फोन आणि एक निरोप आला होता. त्यांनी माध्यमांना नेमके काय सांगितले याची मला माहिती नाही. मात्र, त्यांचा गैरसमज नक्कीच दूर होईल.दरम्यान, जागावाटपाबाबत आमची भूमिका स्पष्ट असून अंतिम निर्णय मुख्य नेते घेतील. या महापालिका निवडणुकीत सन्मानजनक युती व्हावी, ही शिवसैनिकांची अपेक्षा आहे. अंतिम निर्णय आज रात्रीपर्यंत होईल, असेही नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
Web Summary : Discontent brews in Pune's ruling alliance over seat allocation for PMC elections. Shinde Sena insists on 25 seats, while BJP seems hesitant. Final decision expected soon, aiming for a respectful alliance.
Web Summary : पुणे में पीएमसी चुनावों के लिए सीटों के बंटवारे पर गठबंधन में असंतोष है। शिंदे सेना 25 सीटों पर अड़ी है, जबकि बीजेपी हिचकिचा रही है। सम्मानजनक गठबंधन का लक्ष्य, जल्द ही अंतिम फैसला अपेक्षित है।