PMC Elections : पालिका रणधुमाळी सुरू; पुण्यात वातावरण तापले; आघाडी झाल्यास पक्षांतराला ब्रेक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 09:41 IST2025-12-23T09:41:30+5:302025-12-23T09:41:52+5:30
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने पक्षाची ताकद विभागली गेली आहे.

PMC Elections : पालिका रणधुमाळी सुरू; पुण्यात वातावरण तापले; आघाडी झाल्यास पक्षांतराला ब्रेक?
पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने पक्षाची ताकद विभागली गेली आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वबळावर निवडून येणे अवघड आहे. त्यामुळे जागा टिकवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीतील नेते व इच्छुक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. भाजपही महत्त्वाचे नेते आपल्याकडे खेचत आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी सोबत आल्यास पक्षांतराला ब्रेक लागू शकतो. या आघाडीला काँग्रेसची साथ मिळाल्यास महायुतीसोबत 'कांटे की टक्कर' होऊ शकते.
महायुतीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र निवडणूक लढवणार हे निश्चित असले, तरी अद्याप जागा वाटपाचा गुंता सुटलेला नाही. कोणत्या पक्षाला किती जागा, कोणते प्रभाग कोणाच्या वाट्याला, यावरून अंतर्गत चर्चा आणि दबावतंत्र सुरू आहे. युतीतील हा विलंब भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर भाजपच्या जागांवर मोठा परिणाम होऊ शकतो. तसेच महाविकास आघाडी आणि अजित पवार गट यांची युती होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मनसेने महाविकास आघडीबरोबर जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजपकडून ‘एकला चलो’पासून ते आक्रमक इनकमिंगपर्यंत सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि शिवसेना शिंदे गट, आरपीयआय यांच्यातील जागावाटप सूत्र ठरलेले नाही.
उमेदवारीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये खळबळ
पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी दिलेला राजीनामा खळबळ उडवणारा ठरला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आणि नेतृत्वाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, भाजपने इतर सर्वच पक्षांतील माजी महापौर, माजी स्थायी समिती अध्यक्षांसह अनेक माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश करून आपली ताकद वाढवली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनीही भाजप, शरद पवार गटासह उद्धव ठाकरे गटातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना प्रवेश देत आपली बाजू मजबूत केली आहे.
पुण्यात शिंदेसेनेचा फायदा
नगरपरिषद आणि नगरपंचायतीला भाजपपेक्षा जास्त नगराध्यक्ष शिंदेसेनेचे निवडून आले. राष्ट्रवादी आणि भाजपच्या भांडणात शिंदेसेनेचा फायदा होत आहे. पुण्यातही माजी आमदार रवींद्र धंगेकर, शहरप्रमुख नाना भानगिरे, काही दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश केलेले आबा बागुल असे तीन माजी नगरसेवक शिंदेसेनेत आहेत. त्यामुळे शिंदेसेनेचे काहीच नसलेले बळ वाढत आहे.