पुणे : महापालिका निवडणुकीत भाजपला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसोबत काँग्रेसही एकत्र येईल अशी चर्चा असतानाच काँग्रेसने मात्र स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी भाजपला रोखण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. याचा परिणाम मतांच्या फुटीवर होणार असून अप्रत्यक्षरीत्या भाजपलाच फायदा होईल, असे बोलले जात आहे. मात्र, स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसला १६५ उमेदवार मिळणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, उद्धवसेनेसोबत मनसे आल्यास त्यालाही विरोध असल्याचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिका निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच भाजपमध्ये सर्व पक्षांमधून इनकमिंग सुरू झाले. त्यात काँग्रेसचाही समावेश आहे. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये या पक्षांना उमेदवार शोधणे कठीण झाले आहे. परिणामी भाजपला एकत्रित विरोध केला तरच आपले अस्तित्व टिकेल या उद्देशाने राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रित येत आहेत. या आघाडीत काँग्रेसही येणार अशी चर्चा शहरात रंगली होती. त्याचा फायदा काँग्रेसलाही होईल असे वाटत होते. मात्र, मुंबईसह पुण्यातही स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे भाजपविरोधी मोट बांधण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे आता भाजपविरोधातील मतांमध्ये फाटाफूट होऊन भाजपलाच अप्रत्यक्षरीत्या फायदा होईल, असे बोलले जात आहे.
काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी गुरुवारी राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या नेत्यांसह, कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला होता. या आघाडीमुळे कॉंग्रेसला चांगल्या जागा मिळतील असे अनेक नेते खासगीत सांगत होते. मात्र, राष्ट्रवादी सध्या महायुतीत सत्तेत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अजित पवार यांच्यासोबत जायचे नाही असे कॉंग्रेसच्या नेत्यांचे मत झाले. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पुण्याचे प्रभारी आमदार सतेज पाटील, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच पुण्यातील कॉंग्रेसचे नेते उपस्थित होते. दुसरीकडे निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांच्या काँग्रेसने बोलाविलेल्या मुलाखतींना केवळ ३५८ जणांनी उपस्थिती लावली. अनेक प्रभागांमध्ये पक्षाकडून लढण्यास इच्छुक नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आता स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर १६५ उमेदवार कोठून आणणार तसेच गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मिळालेल्या ९ जागा तरी काँग्रेसला मिळतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान भाजपमध्ये सर्वच पक्षांतून आयारामांची संख्या वाढत असल्याने मूळच्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. या इच्छुकांनी बंडखोरी केल्यास काँग्रेसमध्ये त्यांना घेऊन स्वबळाच्या नाऱ्याला जोर देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
अजित पवार यांच्यासोबत जायचे नाही असे ठरले आहे. आता उद्धवसेनेसोबत निवडणूक लढवू. मनसे त्यांच्यासोबत येत असल्यास त्याचा निर्णय सेनेने घ्यायचा आहे. मात्र, राज ठाकरे यांच्यासोबत लढणार नाही. - अरविंद शिंदे, शहराध्यक्ष काँग्रेस
Web Summary : Congress opts for solo PMC election bid, hindering NCP's anti-BJP efforts. Internal dissent simmers within BJP due to incoming members. Congress eyes potential BJP rebels.
Web Summary : कांग्रेस ने पुणे महानगरपालिका चुनाव अकेले लड़ने का फैसला किया, जिससे एनसीपी के भाजपा विरोधी प्रयासों को झटका लगा है। भाजपा में अंदरूनी कलह जारी है। कांग्रेस की नजर भाजपा के बागियों पर।