PMC Elections : बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्ष उमेदवारी यादी उशिरा करणार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:23 IST2025-12-17T12:20:48+5:302025-12-17T12:23:06+5:30
बंडखोरी राेखण्यासाठी सर्वच पक्ष उमेदवारी यादी २८ आणि २९ डिसेंबर रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे.

PMC Elections : बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्ष उमेदवारी यादी उशिरा करणार जाहीर
पुणे : पुणे महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे सर्वच पक्षातील इच्छुकांनी उमेदवारीच्या तिकिटासाठी फिल्डिंग सुरू केली आहे. भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह अन्य पक्षाकडेही इच्छुकांची संख्या अधिक आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर आहे. त्यामुळे बंडखोरी राेखण्यासाठी सर्वच पक्ष उमेदवारी यादी २८ आणि २९ डिसेंबर रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती बुधवारपासून सुरू होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, मनसे यांनी इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज घेतले आहेत. जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी उमेदवार देतानाच आवश्यक असलेली जुळवाजुळव करण्यात येत आहे. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. सुमारे २ हजार ५०० जणांनी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप उमेदवारी यादी उशिरा जाहीर करणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसह अन्य पक्षामध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना पक्षांकडून तिकीट मिळाले नाही, तर इतर पक्षांतून तिकीट मिळविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एकाच पक्षातील काही नगरसेवक एकाच प्रभागात येऊन उमेदवारीचा मोठा पेच निर्माण होणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वडगाव शेरी, कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, पर्वती, शिवाजीनगर या मतदारसंघांमध्ये हा पेच निर्माण झाला आहे. प्रमुख पक्षांकडे निवडणुकीसाठी इच्छुकांची वाढती संख्या असल्याने कोणत्या उमेदवारांना तिकीट द्यावे, असा प्रश्न पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमोर आहे.
बंडखोरी रोखण्यासाठी कस लागणार
महापालिका निवडणुकीत एका जागेसाठी भाजपसह अन्य पक्षामध्ये चार ते पाच जण इच्छुक आहेत. त्यामुळे प्रमुख पक्षामध्ये बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही बंडखोरी राेखण्यासाठी सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा नेतृत्वाचा कस लागणार आहे.
आजी-माजी आमदारांच्या कुटुंबातील उमेदवारीची नावे येताच, निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता
महापालिका निवडणुकीसाठी आजी-माजी आमदारांच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे इच्छुक म्हणून चर्चेत येऊ लागताच निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अनेक निष्ठावंत हे पक्षांतराच्या किंवा बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याने सर्वपक्षीय आमदारांची ही घराणेशाही पक्षांच्या मुळावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घराणेशाहीला थारा नसल्याचा दावा करणाऱ्या भाजपच्या आजी-माजी आमदारांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी दिली जाणार का?, याबाबत उत्सुकता असणार आहे.