पुणे : महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची सर्वाधिक संख्या असलेल्या भाजपने बंडखोरी होणार नाही, याची खबरदारी म्हणून उमेदवारी यादी जाहीर न करता उमेदवारी निश्चित केलेल्यांना थेट फोन करून एबी फॉर्म दिले. मात्र, तरीही भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता असून, याची झलक सोमवारी पाहायला मिळाली.
केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी सर्वाधिक इच्छुक आहेत. महापालिका निवडणुकीत १२०पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष ठेवून भाजपने ज्या प्रभागांमध्ये ताकद कमी आहे, त्या प्रभागातील इतर पक्षांच्या प्रबळ नेत्यांना व इच्छुकांना गळाला लावले आहे. यामध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या पक्षांची ताकद असलेल्या वडगाव शेरी व खडकवासला मतदार संघातील नेत्यांना व इच्छुकांना भाजपमध्ये प्रवेश दिला. तसेच उध्दवसेनेसह काँग्रेसमधीलही नेत्यांना प्रवेश दिले.
स्थानिक आमदारांना विश्वासात न घेता पक्ष प्रवेश केल्याने काहीसी नाराजी व वादावादी झाली होती. मात्र, भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत आमदारांना विश्वासात घेऊन उमेदवारांची नावे निश्चित केली गेली. या नावांची यादी प्रदेश कार्यालयाला पाठवण्यात येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम यादीस मंजुरी देणार असल्याचे सांगितले गेले. याशिवाय शिंदेसेना आणि आठवलेंच्या रिपाइंलाही जागा सोडायच्या आहेत. त्यामुळे भाजप एकूण किती जागा लढवणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
दरम्यान, एकमत झालेल्या उमेदवारांची यादी प्रथम २६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर ही यादी २८ डिसेंबर रोजी रात्री जाहीर होईल, असे सांगण्यात आले. मात्र, आयारामांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षातील निष्ठावंतांचा रोष, एका प्रभागात सरासरी तीस इच्छुक असल्याने ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, त्यांची संख्या मोठी आहे. या गोष्टींचा विचार करून भाजपने संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवार यादी जाहीर न करता नावे निश्चित झालेल्यांना फोन करून थेट एबी फॉर्म देण्यात आले. फोन करून थेट एबी फॉर्म दिले जात असल्याची बाब सोमवारी सकाळपासूनच भाजपच्या सर्व इच्छुकांपर्यंत पोहचली, तर ही बाब ज्यांना माहितीच नव्हती ते यादी जाहीर होण्याकडे डोळे लावून बसले होते. त्यांनाही दुपारनंतर थेट एबी फॉर्म देण्यात आल्याचे समजले. आपला पत्ता कट झाला आहे, हे कळल्यानंतर काहींनी सोमवारी थेट पक्षाला राम राम करत राष्ट्रवादी (अजित पवार)मध्ये प्रवेश केला. आता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी दुपारी ३:०० पर्यंत असल्याने आणखी काही उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बंडखोरी होऊ नये म्हणून खबरदारी घेतलेल्या भाजपलाच सर्वाधिक बंडखोरीचे ग्रहण लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.
Web Summary : Despite distributing AB forms directly to avoid rebellion, Pune BJP faces potential revolt. Disgruntled members joined NCP after being denied tickets. More political shifts expected before deadline.
Web Summary : विद्रोह से बचने के लिए सीधे एबी फॉर्म बांटने के बावजूद, पुणे भाजपा को संभावित विद्रोह का सामना करना पड़ रहा है। टिकट से वंचित असंतुष्ट सदस्य राकांपा में शामिल हुए। समय सीमा से पहले और राजनीतिक बदलाव की उम्मीद।