वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:02 IST2025-12-16T13:02:08+5:302025-12-16T13:02:49+5:30
मनसे नेत्यांनी शिवसेना कार्यालयात जात उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आता उद्धवसेनेचे पदाधिकारी मनसे कार्यालयात जाणार आहे.

वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
पुणे - महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. येत्या १५ जानेवारीला महापालिकेसाठी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक यासह सर्वच महापालिकेत यंदा प्रथमच ठाकरे बंधू एकत्रित येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवे जुने पदाधिकारी रुसवे फुगवे दूर करून एकमेकांच्या गाठी भेटी घेत आहेत. त्यात पुणे महापालिकेतही उद्धव सेना आणि मनसे नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे.
मनसे नेत्यांनी शिवसेना कार्यालयात जात उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या बैठकीला मनसेचे शहरप्रमुख साईनाथ बाबर, बाबू वागस्कर, बाळा शेडगे तर उद्धवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, वसंत मोरे यासह इतर नेते होते. या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये निवडणुकीबाबत अनौपचारिक चर्चा झाली. या चर्चेनंतर आता उद्धवसेनेचे नेते मनसे कार्यालयात बैठकीसाठी जाणार आहेत. त्याठिकाणी जागावाटपाबाबत पहिली चर्चा पार पडेल. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांनी आपापसातील रुसवे फुगवे दूर सारत निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून आले.
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार
वसंत मोरे हे पुण्यातील एककाळचे मनसेचे नेते होते. स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या मतभेदातून मोरे यांनी मनसे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून ते लोकसभा निवडणुकीत उभे होते. परंतु तिथे पराभव झाल्यानंतर वसंत मोरे यांनी वंचितला रामराम करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उद्धवसेनेत प्रवेश केला. वसंत मोरे पुणे महापालिकेत तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून मोरे यांची ओळख होती. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. मात्र आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता असल्याने वसंत मोरे यांना युतीच्या बैठकीनिमित्त का होईना मनसे कार्यालयात जायची वेळ आली आहे.
दरम्यान, शिवसेना आणि मनसेच्या युतीचं सध्या ठरले आहे. जो बाळासाहेब ठाकरे यांच्या कुशीत तयार झालेला कार्यकर्ता आहे त्याला या निवडणुकीच्या तिकिट वाटपात प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानंतर कोण येणार किंवा नाही यावर चर्चा करू. आम्ही सगळे एकत्र आल्याने सत्ताधारी भाजपाच्या सगळ्या जागा धोक्यात आल्यात असं मनसे नेते बाबू वागस्कर यांनी सांगितले.