पुणे - पुणे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला असून यंदाच्या निवडणुकीत नात्यागोत्यांच्या जोड्यांमुळे विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. पितापुत्र, पती-पत्नी, भाऊ-भाऊ अशा अनेक जोड्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पूर्व पुण्यातील प्रभाग क्रमांक ३ आणि ४ मधून पती-पत्नीची जोडी निवडणूक लढवत आहे. ऐश्वर्या पठारे आणि सुरेंद्र पठारे या दोघांची उमेदवारी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
प्रभाग क्रमांक ३ मधून उमेदवार असलेल्या ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांची ओळख केवळ राजकीय नाही, तर व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातही ठळक आहे. पुण्यातील फरग्युसन महाविद्यालय आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग येथून त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर फेसबुक, निसानसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट विभागात आयटी इंजिनिअर म्हणून त्यांनी काम केले.
आयटी क्षेत्रात उत्तम कारकीर्द सुरू असतानाच ऐश्वर्या पठारे यांची राजकारणात एन्ट्री झाली. २०१४ साली त्यांना महाराष्ट्र युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. युनेस्को, युनिसेफसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत त्या आधीपासूनच समाजकार्यात सक्रिय होत्या. सात महिन्यांपूर्वी त्यांचे लग्न झाले असून त्या एका राजकीय कुटुंबाची सून झाल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे.
महापालिका निवडणुकीदरम्यान अचानक घडलेल्या काही घडामोडींमुळे त्यांना थेट निवडणूक रिंगणात उतरावे लागले. उमेदवारी मिळाल्यानंतर प्रभागाविषयी भूमिका स्पष्ट करताना त्यांनी थेट आयटी भाषेचा वापर केला. “आयटी भाषेत सांगायचं झालं तर मी वार्ड क्रमांक ३ ‘डी-बग’ करतेय. कोड लिहिल्यानंतर जिथे अडचणी येतात, तिथे बग ओळखून पुन्हा कोड सुधारला जातो. तसंच मी प्रभागाचा सखोल आढावा घेतला आहे,” असे त्या म्हणाल्या.
प्रभागात फिरताना रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट यांसारख्या मूलभूत सुविधांच्या अनेक अडचणी समोर आल्या. “या सगळ्या समस्या म्हणजे प्रभागातील ‘बग्स’ आहेत. त्या ओळखूनच आम्ही मॅनिफेस्टो तयार केला आहे. निवडून आल्यानंतर प्रत्येक समस्येवर ‘पॅच’ लावणार आणि संपूर्ण प्रभाग डी-बग करणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
“मी केवळ कॉर्पोरेटर म्हणून नव्हे, तर प्रभाग क्रमांक ३ ची एक उत्कृष्ट ‘प्रोजेक्ट मॅनेजर’ म्हणून काम करेन. हेच आमच्या पॅनलचे व्हिजन आहे,” असे सांगत ऐश्वर्या पठारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आयटी पार्श्वभूमी, सामाजिक कामाचा अनुभव आणि वेगळ्या दृष्टिकोनामुळे ऐश्वर्या पठारे यांची उमेदवारी पूर्व पुण्यात विशेष लक्ष वेधून घेत आहे.
Web Summary : Aishwarya Pathare, an IT professional contesting PMC election, aims to solve ward issues like debugging code. She pledges to be a 'Project Manager' for Ward 3, fixing basic infrastructure problems and ensuring development with her IT background.
Web Summary : पीएमसी चुनाव लड़ रहीं आईटी पेशेवर ऐश्वर्या पठारे, वार्ड की समस्याओं को कोड डिबगिंग की तरह हल करने का लक्ष्य रखती हैं। उन्होंने वार्ड 3 के लिए 'प्रोजेक्ट मैनेजर' बनने, बुनियादी ढांचा समस्याओं को ठीक करने और अपने आईटी पृष्ठभूमि के साथ विकास सुनिश्चित करने का संकल्प लिया।