पुणे : महापालिका निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि रिपाइंचे शहराध्यक्ष सोडून तर सर्वच राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष आपले नशीब आजमावत आहेत. पुणेकर जनता कोणत्या शहराध्यक्षासाठी महापालिका सभागृहाचा दरवाजा उघडणार आणि कोणत्या शहराध्यक्षास घरचा रस्ता दाखवणार, हे १६ जानेवारी रोजीच स्पष्ट होणार आहे.
महापालिका सभागृह विसर्जित झाल्यापासून गेली पावणेचार वर्षांपासून महापालिकेत प्रशासक राज आहे. न्यायालयाच्या कचाट्यात अडकलेली महापालिकेची निवडणूक केव्हा होणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते; मात्र न्यायालयाच्या आदेशाने अखेर महापालिकेची निवडणूक घेतली जात आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदतही संपली आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि आप हे पक्ष सोडले तर दोन राष्ट्रवादीसह इतर पक्षांच्या एबी फॉर्म आणि उमेदवारांमध्ये गोंधळाचे चित्र आहे. आपले किती उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, आपण किती एबी फॉर्म दिले आहेत, हे पक्षाच्या नेत्यांनाही सांगणे कठीण झाले आहे.
असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि रिपाइंचे शहराध्यक्ष सोडून तर सर्वच राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष आपले नशीब आजमावत आहेत. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे हे प्रभाग २७ (नवी पेठ, पर्वती), काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे प्रभाग १३ (पुणे स्टेशन, जयजवान नगर), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप हे प्रभाग ३६ (सहकार नगर, पद्मावती), उद्धवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे हे प्रभाग २३ (रविवार पेठ, नानापेठ), शिंदेसेनेचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे हे प्रभाग ४१ महम्मदवाजी, उंड्री, मनसेचे शहरप्रमुख साईनाथ बाबर हे प्रभाग १९ (कोंढवा खु., कौसर बाग) आणि आपचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे हे प्रभाग ९ (सुस, बाणेर, पाषाण) व धनंजय बेनकर हे प्रभाग ३४ (वडगांव बु., नऱ्हे, धायरी) येथून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत; मात्र त्यांनी पक्षांतर करून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आता या सर्व शहराध्यक्षांपैकी किती जणांना पुणेकर महापालिकेत पाठवणार आणि कुणाला घरचा रस्ता दाखवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Web Summary : Pune's municipal election sees many party city heads contesting, excluding NCP (Sharad Pawar) and RPI. Voters will decide their fate on January 16, determining who enters the corporation and who stays out.
Web Summary : पुणे नगर निगम चुनाव में एनसीपी (शरद पवार) और आरपीआई को छोड़कर कई पार्टी प्रमुख मैदान में हैं। मतदाता 16 जनवरी को फैसला करेंगे कि कौन निगम में प्रवेश करता है और कौन बाहर रहता है।