पुणे : भाजपने पुण्याबाबत केवळ घोषणा केल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात ते प्रकल्प पूर्ण झाले नाहीत. ‘पुणे फर्स्ट’ हेच आमचे प्रमुख ध्येय राहणार आहे. पुणेकरांनी आम्हाला पाच वर्षांची संधी द्यावी, दिलेले शब्द आम्ही पाळू. त्यासाठी खड्डेमुक्त रस्ते, वाहतूक कोंडीपासून सुटका, समान पाणीपुरवठा, पीएमपीचे सक्षमीकरण, महापालिकेच्या शाळा आणि पायाभूत सुविधांचे सबलीकरण, प्रदूषणापासून मुक्तता करण्याबरोबरच पुणे शहराला पर्यटनाची राजधानी करण्याचे आश्वासन गुरुवारी काँग्रेसने पुणेकरांना ‘अधिकारनामा’च्या माध्यमातून दिले.
ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री व पुण्याचे प्रभारी आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत महापालिका निवडणुकीसाठी ‘पुणे फस्ट’ या नावाने आधारनामा जाहीर करण्यात आला. शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चौधरी, ॲड. अभय छाजेड, प्रशांत जगताप, अजित दरेकर आणि शहर युवक अध्यक्ष सौरभ अमराळे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘सत्तेत असलेली लोक पाण्याबाबत बोलत नाहीत. पुरेशा पाण्यासाठी नागरिकांना एनजीटीमध्ये जावे लागले. भाजपने पुण्याबाबत केवळ घोषणा केल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात ते प्रकल्प पूर्ण झाले नाहीत. ‘पुणे फर्स्ट’ हेच आमचे प्रमुख ध्येय राहणार आहे.’’ पुणेकरांनी आम्हांला पाच वर्षांची संधी द्यावी, दिलेले शब्द आम्ही पाळू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महापालिकेत सत्तेत असताना पक्षाने केलेली कामांवर जोर दिला आहे. तर सत्तेत आल्यावर कोणत्या कामांना प्राधान्य देणार हे नमूद करण्यात आले आहे.