भिंतींवरील रोपांना मिळाला पुनर्जन्म, तळजाईवर हक्काचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:13 IST2021-08-23T04:13:57+5:302021-08-23T04:13:57+5:30
तळजाई वनविहारामध्ये, जाणीव जागृती फाउंडेशनतर्फे हा वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. फाउंडेशनतर्फे नागरिकांना अशी रोपं दान देण्याचे आवाहन करण्यात आले ...

भिंतींवरील रोपांना मिळाला पुनर्जन्म, तळजाईवर हक्काचे घर
तळजाई वनविहारामध्ये, जाणीव जागृती फाउंडेशनतर्फे हा वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. फाउंडेशनतर्फे नागरिकांना अशी रोपं दान देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी त्यांच्याकडे नको असलेली रोपं त्यांना दिली. देवघरात आलेले नारळ, रोपात वाढलेले, वड, पिंपळ, आंबा अशी सुमारे ६७ रोपं मिळाली आणि ही रोपं तळजाईवर लावण्यात आली आहेत. त्यामुळे या रोपांचा जणूकाही पुनर्जन्मच झाला आहे. अन्यथा नागरिकांनी ही रोपं काढून इतरत्र कुठे तरी टाकली असती.
फाउंडेशनतर्फे ११ जुलै २०२१ पासून सुरुवात करण्यात आली. २२ ऑगस्ट रोजी त्याचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला. संस्थेतर्फे त्या झाडाचे संगोपन करण्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. पुढील काळात देखील असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती फाउंडेशनचे ईश्वर कसबे यांनी दिली. या उपक्रमात संस्थेचे अश्विनी कसबे, सोनाली भिंताडे, मालती जाधव, अक्षय जाधव, चेतन कदम, राहुल भिंताडे, जागृती कसबे, ऋग्वेद भिंताडे, चित्रा जाधव आदींनी सहभाग घेतला.
------------------------------
नांद्रुकची २० रोपांची लागवड
सुमारे २० रोपं ही नांद्रुक या झाडाची होती. या झाडाला खूप महत्त्व आहे. या झाडाच्या पानांचा रस वांतिकारक व कृमिनाशक असून दम्यावर हळद व मिरी यांसह तुपातून पोटात देतात. पक्ष्यांना हे झाड खूप आवडते. यावर घरटी करतात. लाकूड जळणासाठी वापरतात. सालीपासून बळकट धागा मिळतो, अशा सुंदर झाडे तळजाईवर लावली आहेत, असे ईश्वर कसबे यांनी सांगितले.