रखडलेले सिंचन प्रकल्प लागणार मार्गी

By Admin | Updated: December 20, 2014 00:02 IST2014-12-20T00:02:11+5:302014-12-20T00:02:11+5:30

भोर, वेल्हे तालुक्यातील नीरा-देवघर व गुंजवणी-चापेट प्रकल्पांतर्गत रखडलेले कालवे, उपसा जलसिंचन योजना तसेच प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन तातडीने करा

The planned irrigation project will be completed | रखडलेले सिंचन प्रकल्प लागणार मार्गी

रखडलेले सिंचन प्रकल्प लागणार मार्गी

भोर : भोर, वेल्हे तालुक्यातील नीरा-देवघर व गुंजवणी-चापेट प्रकल्पांतर्गत रखडलेले कालवे, उपसा जलसिंचन योजना तसेच प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन तातडीने करा, असे आदेश जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी गुरुवारी दिले.
नागपूर येथे आमदार संग्राम थोपटे तसेच प्रकल्पग्रस्त व अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत वरील आदेश देण्यात आले.
भोर, वेल्हे तालुक्यातील धरणांचे कालवे, उपसा योजना व पुनर्वसनाच्या रखडलेल्या कामांसंदर्भात बैठक घ्यावी, अशी मागणी थोपटे यांनी केली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी सकाळी शिवतारे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली.
बैठकीला थोपटे यांच्यासह जलसंपदा विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता शहा, अधीक्षक अभियंता चौधरी, कार्यकारी अभियंता पी. ए.पवार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी तुषार ठोंबरे, भोरचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार राम चोबे, भाटघर प्रकल्पग्रस्त संघटनेचे सरचिटणीस आनंद सणस, खेरदी-विक्री संघाचे अध्यक्ष हनुमंत शिरवले, संदीप नगिणे, गणपत देवगिरीकर आदी उपस्थित होते.
बैठकीत गुंजवणी- चापेट प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना स्लॅबपात्र धारकांची यादी करून धानेप, वेल्हे बु., कोदापूर व भोसलेवाडी येथील जागेचे भूखंड तातडीने वाटप करावे, कि.मी. ० ते ८६ पर्यंत मौजे राख (पुरंदर) या गावापर्यंत बंद पाइपलाइनद्वारे कालव्याचे कामाचे व मौजे दिवळे (भोर) येथून मौजे नारायणपूर (पुरंदर) येथे उपसा जलसिंचन योजनेचे तातडीने सर्वेक्षण करून अंतिम अहवाल सादर करावा, गुंंजवणी-चापेट धरणातील तिराचे (बाह्यवळण) सुमारे ४ कि.मी. अंतराच्या रस्त्याचे अंदाजपत्रक तातडीने बांधकाम विभागाकडे हस्तांतर करावे, वेनवडी उपसा जलसिंचन योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्याच्या निविदा काढाव्या, असे आदेश या वेळी देण्यात आले. या सर्व विषयांचा फेरआढावा घेण्यासाठी १३ जानेवारीला मुंबईत बैठक घेण्यात येणार असल्याचेही या वेळी ठरले.
दरम्यान, शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे, माजी जि.प. सदस्य रमेश कोंडे, माजी उपसभापती अमोल पांगारे व इतर पदाधिकाऱ्यांनी शिवतारे यांची नागपूर येथे भेट घेऊन नीरा-देवघर व गुंजवणी धरणातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन देऊन कामे मार्गी लावण्याची मागणी केली. (वार्ताहर)

Web Title: The planned irrigation project will be completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.