पुलं आनंदवनचे ब्रँडअँबेसेडर : डॉ. विकास आमटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 20:52 IST2018-11-21T20:49:50+5:302018-11-21T20:52:23+5:30
बाबा आमटे आणि पुलंचे गुरूबंधुचे नाते होते. ज्या काळात आमच्या कुष्ठरूग्णांनी बनवलेले कपडे वापरण्यास समाज कचरत होता, त्या काळात स्वतः पुलंनी हे कपडे वापरून समाजाची मानसिकता बदलण्याचे काम केले

पुलं आनंदवनचे ब्रँडअँबेसेडर : डॉ. विकास आमटे
पुणे : बाबा आमटे आणि पुलंचे गुरूबंधुचे नाते होते. ज्या काळात आमच्या कुष्ठरूग्णांनी बनवलेले कपडे वापरण्यास समाज कचरत होता, त्या काळात स्वतः पुलंनी हे कपडे वापरून समाजाची मानसिकता बदलण्याचे काम केले. पुलं हे खऱ्या अर्थाने आनंदवनाचे ब्रँड अॅम्बॅसिडर होते अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी पु.ल. देशपांडे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
'पु. ल. परिवार’ आणि 'आशय सांस्कृतिक’च्या वतीने आयोजित पुलोत्सवात आज ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांना बालगंदर्व रंगमंदिरात ज्येष्ठ समाजसेवक आणि लेखक डाॅ. अनिल अवचट यांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रूपये पंचवीस हजार असे या सन्मानाचे स्वरूप आहे. यावेळी व्यासपीठावर आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, स्क्वेअर वनचे नयनीश देशपांडे, पिनॅकल ग्रुपचे गजेंद्र पवार, काॅसमाॅस बॅंकेंचे अध्यक्ष मिलिंद काळे, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमटे म्हणाले की, पुलंमुळे साहित्य, संगीत, कला अशा विविध क्षेत्रातील मंडळी आनंदवनात येऊ लागली. खऱ्या अर्थाने आमचे त्यांच्याशी रक्ताचे नाते होते. त्यांच्यामुळे वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, विश्राम बेडेकर, तीर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्राचार्य राम शेवाळकर अशा अनेक दिग्गजांचे आनंदवनसोबत ऋणणानुबंध जुळले. या मंडळींमुळे आनंदवनाचे काम सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यास खूप मोठा हातभार लागला.
डॉ. अनिल अवचट म्हणाले की, आमटे कुटुंबियांचे समाजकार्य म्हणजे घराणेशाही नसून समाजकार्याचा तो वारसा आहे. स्वतः बाबा वकील आणि त्यांची मुले डॉक्टर असताना त्यांनी पैशाच्या मागे न धावता केलेले काम सलाम करण्यासारखे आहे. आम्ही मुक्तांगणचे काम मध्यवर्ती ठिकाणी केले मात्र असं जंगलात जाऊन काम करणे अतिशय अवघड आहे. पैशाला देव मानणाऱ्या जगात अशी माणसेजैविक अपघात असल्यासारखी वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव यांनी केले. तर आशय सांस्कृतिकचे सतीश जकातदार यांनी आभार मानले.
आनंदवन आणि पुलं'चे किस्से
या कार्यक्रमात बोलताना आमटे यांनी पुलंच्या हजरजबाबीपणाचे किस्सेही सांगितले. मंत्र्यांच्या हस्ते कोनशिला करण्याचा विषय निघाल्यावर पुलंनी तात्काळ उच्चारलेल्या 'मंत्र्यांच्या हस्ते कानशिला समारोह साजरा करण्याचे दिवस आहेत, कोनशीला नाही' वाक्याची आठवण सांगितली. सर्वत्र फुले तोडण्यास मनाई आहे असे लिहिले जात असताना पुलंनी सुचवल्याप्रमाणे ''आनंदवनात फुले तोडली जात नाही' असा फलक आजही आनंदवनात असल्याचे सांगितले.