पिनाका रॉकेटच्या यशस्वी चाचणीचा वालचंदनगर कंपनीमध्ये जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 00:24 IST2019-03-20T00:24:16+5:302019-03-20T00:24:51+5:30
भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या व भारतीय संरक्षणाचा पाया अधिक भक्कम करणाऱ्या गाइडेड पिनाका मार्क २ या मल्टिबॅरल रॉकेट लाँचर प्रणालीची राजस्थानातील पोखरणच्या वाळवंटात यशस्वी चाचणी घेण्यात आली.

पिनाका रॉकेटच्या यशस्वी चाचणीचा वालचंदनगर कंपनीमध्ये जल्लोष
निमसाखर - भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या व भारतीय संरक्षणाचा पाया अधिक भक्कम करणाऱ्या गाइडेड पिनाका मार्क २ या मल्टिबॅरल रॉकेट लाँचर प्रणालीची राजस्थानातील पोखरणच्या वाळवंटात यशस्वी चाचणी घेण्यात आली. या प्रणालीच्या निर्मितीत वालचंदनगर कंपनीचा मोठा सहभाग असल्यामुळे येथील कामगारांनी पेढेवाटप करून आनंदोत्सव साजरा केला.
वालचंदनगर आणि डीआरडीओचे उपसंचालक शास्त्रज्ञ भीमाशंकर गुरव यांचे एक अतुट नाते आहे. नुकतेच गुरव व सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून स्वदेशी बनावटीच्या गाइडेड पिनाका या दिशादर्शक रॉकेट यंत्रणेची चाचणी राजस्थान येथे यशस्वी झाल्याने वालचंदनगरमध्ये पेढेवाटप करुन आनंद साजरा करण्यात आला. वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर इंडस्ट्रीज ही जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवलेली कंपनी आहे. संरक्षण दलासाठी तसेच शस्त्रास्त्रे यांच्यासाठी आवश्यक लागणारे अनेक महत्त्वाचे भाग येथे बनवले जातात. अशा ठिकाणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक शास्त्रज्ञ भीमाशंकर गुरव नेहमीच येथील कामगारांना मार्गदर्शन करतात. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम हे आपले आदर्श व स्फूर्तिस्थान असल्याचे स्वत: गुरव सांगतात. या पिनाका प्रकल्पावर गुरव यांनी मोठे काम केले आहे. यामुळे वालचंदनगर परिसरात गाइडेड पिनाक या दिशादर्शक रॉकेट यंत्रणेची चाचणी नुकतीच यशस्वी चाचणी झाल्याने वालचंदनगरमध्ये पेढे वाटप करुन आनंद साजरा केला. या वेळी वालचंदनगर कंपनीतील कामगारांनी एकत्र येत पेढेवाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी वालचंदनगर स्वामी समर्थ सेवा मंडळातर्फे गुरव यांना शुभेच्छा दिल्या.
गेल्या अनेक वर्षांपासून स्वदेशी बनावटीच्या गाइडेड पिनाक या दिशादर्शक रॉकेट यंत्रणेवर काम सुरु होते. नुकतेच काम पूर्ण होऊन पूर्वी असलेल्या ३८ किलोमीटर एवढ्या मारक क्षमतेत वाढ करत सध्या गाइडेड पिनाकची मारकक्षमता ८० किलोमीटरपर्यंत लक्ष्यावर वेध घेण्याची वाढविण्यात आली आहे.
राजस्थानातील पोखरणच्या वाळवंटात ही चाचणी घेण्यात आली. दिशादर्शक यंत्रणेबरोबरच या यंत्रणेत नियंत्रण यंत्रणाही आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) ‘पिनाका’ विकसित केली असून, तिच्यामुळे तोफखान्याच्या अचूकतेत वाढ होणार आहे.