स्वबळावर की युतीत लढायचे याविषयी स्थानिक पातळीवरची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ
By विश्वास मोरे | Updated: September 21, 2025 16:32 IST2025-09-21T16:31:52+5:302025-09-21T16:32:23+5:30
अजित पवार म्हणाले, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत. त्यासाठी आम्हीही तयारी करत आहोत.

स्वबळावर की युतीत लढायचे याविषयी स्थानिक पातळीवरची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ
पिंपरी : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत. आम्हीही तयारी करत आहोत, महायुती सक्षम करण्याकडे आमचा प्रयत्न आहे, निवडणुका जाहीर झाल्यावर स्थानिक पातळीवरची परिस्थिती पाहून वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊ, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेस परिवार मिलन कार्यक्रमासाठी पिंपरीत आले असताना पवार पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत. त्यासाठी आम्हीही तयारी करत आहोत. त्यासाठी दोन दिवस शहरातील परिवार मिलन कार्यक्रमांना उपस्थिती लावली. जनसंवादच्या माध्यमातून प्रश्न जाणून घेतले. प्रशासनाशी संवाद साधून प्रश्न मार्गी लावले. कार्यकर्त्यांच्या भावना समजावून घेतल्या. तसेच महायुती सक्षम करण्याकडे आमचा प्रयत्न आहे.'
मी जोतिषी नाही
महापालिका निवडणुका अगोदर कि जिल्हा परिषद निवडणूक अगोदर होणार? असे विचारले असता, पवार म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही. ते निवडणूक आयोग ठरवेल. निवडणुकांना स्वबळावर लढायचे की नाही, याबाबत निवडणुका जाहीर झाल्यावर स्थानिक पातळीवर नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी आणि सर्वांशी चर्चा केली जाईल. परिस्थिती पाहून वरिष्ठ पातळीवर पक्ष आणि कार्यकर्ते हिताचा निर्णय घेतला जाईल.'
ठोकशाही केली जाऊ नये
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत अजित पवार म्हणाले, 'अशा घटना महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत, ठोकशाही केली जाऊ नये.' मनोज जरांगे यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी दसऱ्याका अल्टिमेटम दिला आहे, असे विचारल्यावर पवार म्हणाले, 'कोणत्याही वर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ज्या मागण्या आहेत, त्या कायद्याच्या चौकटीत बसवत न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे.'
तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे
अजित पवार यांची उद्धव बाळासाहेब ठाकरें गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या पत्नी उषा वाघेरे आणि मुलगा ऋषीकेश वाघेरे यांनी भेट घेतली. त्यानंतर संजोग वाघेरे पक्षात येणार का? या प्रश्नावर पवारांनी मिश्किल उत्तर दिले. पवार म्हणाले, 'संजोग उबठामध्ये आहे. उषा आमच्याबरोबर आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. संजोगला विचारसरणी पटली म्हणून तो तिकडे आहे. उषाला आमची विचारसरणी पटली. म्हणून त्या माझ्याबरोबर आहेत. अनेकांच्या घरात अशीच स्थिती आहे. अगदी आमच्यासहित खूप उदाहरण देता येतील.' या उत्तरावर एकच हशा पिकला.