वाहतूक 'पीएमआरडीए'च्या प्रकल्पांना मिळणार गती;नवीन रस्ते, भुयारी मार्गामुळे अपघात सत्र, वाहतूककोंडीला बसेल आळा
By नारायण बडगुजर | Updated: December 5, 2025 18:54 IST2025-12-05T18:53:36+5:302025-12-05T18:54:21+5:30
ही कामे सध्या निविदा प्रक्रियेत असून, पूर्ण झाल्यानंतर सिग्नल कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे. तिन्ही पूल, उड्डाणपूल प्रकल्पांसाठी ४०३ कोटी राखून ठेवले आले आहेत.

वाहतूक 'पीएमआरडीए'च्या प्रकल्पांना मिळणार गती;नवीन रस्ते, भुयारी मार्गामुळे अपघात सत्र, वाहतूककोंडीला बसेल आळा
पिंपरी :पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडी, रस्तेजोडणी आणि दळणवळण सुधारण्यासाठी राबवलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळू लागली आहे. प्राधिकरणाच्या २२० प्रकल्पांपैकी ३३ हजार ७४४ कोटींची तरतूद केवळ वाहतूक संबंधित उपक्रमांसाठी करण्यात आली असून, यामुळे पुणे व उपनगरांतील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
'पीएमआरडीए'ने रस्ते विकासाला प्राधान्य देत, १२७ रस्ते प्रकल्पांसाठी १८,३७६ कोटी मंजूर केले आहेत. तब्बल ५८९ किमी लांबीचे नवे रस्ते आणि रुंदीकरणाची कामे सुरू असून, अनेक प्रकल्प बांधकाम व भूसंपादनाच्या टप्प्यात पुढे सरकत आहेत. वाहतूक ताण कमी करण्यासाठी १७ चौक सुधारणा प्रकल्पांना ४५ कोटींची मंजुरी देण्यात आली आहे. ही कामे सध्या निविदा प्रक्रियेत असून, पूर्ण झाल्यानंतर सिग्नल कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे. तिन्ही पूल, उड्डाणपूल प्रकल्पांसाठी ४०३ कोटी राखून ठेवले आले आहेत.
पुणे मेट्रो आणि येरवडा-कात्रज बोगदा
सार्वजनिक वाहतुकीला बळ देण्यासाठी २३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी ७,४२० कोटींची तरतूद असून, मार्चपर्यंत तो सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. वीस किलोमीटरचा येरवडा-कात्रज बोगदाही विचाराधीन आहे. अंदाजे ७,५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या बोगद्याची व्यवहार्यता चाचणी सुरू आहे.
प्रकल्प हस्तांतरणाच्या अंतिम टप्प्यात
यवत उड्डाणपूल आणि हिंगणगाव डबल डेकर उड्डाणपूल हे प्रकल्प विशेष लक्षवेधी असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक डबल डेकर प्रकल्प हस्तांतरणाच्या अंतिम टप्प्यात आहे.
वाहतूककोंडी, अपघात सत्र
'पीएमआरडीए' हद्दीतील हिंजवडी आयटी पार्क, चाकण एमआयडीसी यासह खेड, मुळशी व मावळ तालुक्यात अपघातसत्र सुरू आहे. दररोज वाहतूक कोंडीची समस्या आहे. त्यासाठी रस्ते, मेट्रो मार्ग, भुयारी मार्गासह विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यात काही रस्त्यांची कामे सुरू आहेत. नव्याने काही रस्ते, भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत. नवीन वर्षात मेट्रो मार्गाचे काम पूर्ण होईल. - डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, 'पीएमआरडीए'