पिंपरी : महापालिकेच्या वतीने दिल्ली येथील म्युनिसिपल स्कूलच्या धर्तीवर शिक्षण पॅटर्न राबविण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. आता लडाख पॅटर्न राबविला जाणार आहे. त्यासाठी आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी व शिक्षकांनी नुकताच लडाखचा अभ्यास दौरा केला. या नव्या शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना कितपत लाभ होणार? याची उत्सुकता आहे.
तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी महापालिका शाळेत एकसूत्रता यावी, म्हणून दिल्लीतील म्युन्सिपल स्कूलचा अंगीकार केला. त्यासाठी महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांचा दिल्लीत अभ्यास दौरा झाला. तीन ते चार वेगवेगळे अभ्यास दौरे झाले. दिल्लीच्या म्युन्सिपल स्कूलप्रमाणे महापालिका शाळेत सुधारणा करून शिक्षण पद्धती
राबविली जात आहे, असे असताना आता लडाख येथील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या शिक्षण पद्धती महापालिका शाळेत आणण्याचे नियोजन सुरू झाले आहे.
वांगचुक यांनी लडाख येथे सन १९८८ मध्ये स्टुडंट्स एज्युकेशनल अॅण्ड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख (एसईसीएमओएल) ही नापास विद्यार्थ्यांची शाळा सुरू केली. ती शाळा व्यावहारिक अनुभवावर आधारित आहे. त्यात मातृभाषेत शिक्षण दिले जाते.
वांगचुक यांनी गीतांजली अंगमो यांच्यासोबत हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ (एचआयएएल) ची स्थापना केली आहे. वांगचुक यांनी सुरू केलेली शिक्षण पद्धत महापालिका शाळेत सुरू करण्याचे अल्टरनेटिव्हज लडाख अधिकाऱ्यांचे नियोजन आहे. त्यासाठी आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी व शिक्षकांनी नुकताच लडाखचा अभ्यास दौरा केला आहे.
इंदूर पॅनर्टही...
तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी इंदूर शहराच्या धर्तीवर घनकचरा व्यवस्थापन कार्यपद्धती पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू केली. त्या अंतर्गत घराघरांतून ओला व सुका कचरा वेगवेगळा स्वीकारला जात आहे. जनजागृतीसाठी स्वयंसेवक नेमले आहेत. त्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत.
सोनम वांगचुक यांच्या लडाख येथील शाळेला पालिकेच्या शिक्षण विभागाच्या शिक्षकांनी नुकतीच भेट दिली. एकूण २५ शिक्षकांना तेथे प्रशिक्षण देण्यात आले. लडाख येथील शिक्षणाची पद्धत पालिका शाळेत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानात भर पडणार आहे. - किरणकुमार मोरे, सहायक आयुक्त, महापालिका