वडगाव मावळ - नवलाख उंबरे (ता. मावळ) गावाचे माजी उपसरपंच हनुमंत बबुशा कोयते (वय ४४) यांचे मंगळवारी (दि.६) सकाळी मधमाश्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. दत्ता कडलक, लक्ष्मण कदम, एकनाथ धायबर (सर्व रा. नवलाख उंबरे, ता. मावळ) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना नवलाख उंबरे येथील राम कडा येथे सोमवारी सकाळी घडली. ही घटना नवलाख उंबरे येथील राम कडा येथे सोमवारी सकाळी घडली.
तळेगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवलाख उंबरे येथील चार तरुण मॉर्निंग वॉक करण्यासाठी नवलाख डोंगरावर राम कडा येथे गेले होते. तिथे असलेल्या मधमाश्यांनी हल्ला केला. त्यात दोन तरुण जोरात पळून खाली आले; तर दोघा जणांवर मधमाश्यांनी जोरदार हल्ला केला.
त्यात कोयते (४४) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब जगदाळे तपास करत आहेत.