पिंपरी : विदेशात नोकरी देतो, असे सांगत रजिस्ट्रेशन फी, व्हेरिफिकेशन, व्हिसा आणि इतर वेगवेगळ्या कारणांसाठी महिलेकडून २९ लाख ९७ हजार ७६८ रुपये घेत नोकरी न देता फसवणूक केली. ही घटना २६ नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२५ या कालावधीत नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.
हर्ष मिश्रा, शिवांश पटारीया, अविनाश मिश्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने ४ मार्च २०२५ रोजी संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला संशयितांनी फोनवरून संपर्क केला. महिलेची प्रोफाइल नोकरी डॉट कॉम वर पाहिली असून, त्यांना जॉबची ऑफर असल्याचे संशयिताने सांगितले. महिलेकडून रजिस्ट्रेशनसाठी आठ हजार ५०० रुपयांची मागणी केली. त्यानंतर महिलेने तिच्या वडिलांसाठी विदेशात जॉब मिळेल का, याबाबत चौकशी केली. त्यावर संशयितांनी फिर्यादी यांच्या वडिलांसोबत बोलून त्यांची माहिती घेतली.
त्यानंतर त्यांना युकेमध्ये जॉब असून, त्यासाठी रजिस्ट्रेशन फी, कागदपत्रे व्हेरिफिकेशन फी, व्हिजा फी, व्हिजाचे नियम बदलले असल्याचे सांगत कन्व्हरजेन चार्जेस, कंपनीचे सिक्युरिटी डिपॉझिट, कंपनीचा आयडी तयार करण्यासाठी, इन्शुरन्ससाठी, संबंधित कंपनीतील एचआर पॅनलमधील मेम्बर बदलले असून नवीन मेंबर पैशांची मागणी करत असल्याचे सांगत आणखी पैशांची मागणी केली. त्यानंतर काही कारणांमुळे युकेमध्ये जॉब मिळत नसून ऑस्ट्रेलियामध्ये जॉब असल्याचे सांगून आणखी पैसे घेत संशयितांनी फिर्यादीकडून २९ लाख ९७ हजार ७६८ रुपये घेत फसवणूक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार तपास करीत आहेत.