महापालिकेची प्रभाग रचना कोणासाठी पूरक आणि कोणासाठी मारक ठरणार ?

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: August 24, 2025 16:51 IST2025-08-24T16:50:20+5:302025-08-24T16:51:15+5:30

पुन्हा २०१७ मधील डावपेच : भाजपच्या प्रतिष्ठेची, तर अजित पवार गटाच्या अस्तित्वाची लढाई; निवडणूक चुरशीची होणार; महायुतीतील विसंवादाचा फायदा महाविकास आघाडी घेणार का?

pimpari-chinchwad news for whom will the ward structure of the Municipal Corporation be complementary and for whom detrimental? | महापालिकेची प्रभाग रचना कोणासाठी पूरक आणि कोणासाठी मारक ठरणार ?

महापालिकेची प्रभाग रचना कोणासाठी पूरक आणि कोणासाठी मारक ठरणार ?

पिंपरी : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना भाजपने आपल्या सोयीचीच ठेवल्याचा आरोप सुरू झाला आहे. त्यातच महायुतीमध्ये विसंवाद जाणवत असून, भाजपसाठी प्रतिष्ठेची आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी अस्तित्वाची लढाई होणार आहे. प्रभाग रचनेवरून उमटणाऱ्या प्रतिक्रिया आणि स्थानिक राजकीय घडामोडींमुळे निवडणूक चुरशीची होणार असल्याची चिन्हे आहेत. महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिंदेसेना हे तीनही पक्ष जोरदार तयारीत आहेत.

महायुतीत विसंवाद कायम

महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिंदेसेना हे प्रत्येक गट आपल्यापुरताच विचार करत आहे. अजित पवार गटाची पारंपरिक मते आणि स्थानिक प्रभाव अजूनही दिसत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षही तयारी करत आहेत. प्रारूप प्रभाग रचना भाजपने आपल्या सोयीची केल्याचा आरोप त्यांच्यातून होत आहे.

पक्षसंघटन मजबुतीवर भाजपचा नेहमीच भर

महापालिकेत प्रत्यक्ष लढत भाजप आणि अजित पवार गटातच होईल, असे चित्र आहे. गेल्या काही वर्षात भाजपने शहरात संघटन मजबुतीवर भर दिला असून माजी नगरसेवकांना आपल्याकडे वळवले आहे.

काहीजण बंडखोरीच्या तयारीत

कोणत्या पक्षाकडून लढायचे याबाबत अनेक माजी नगरसेवक व इच्छुक अद्याप संभ्रमात आहेत. महायुतीतील भाजप की राष्ट्रवादी पक्ष की पर्याय म्हणून महाविकास आघाडीतील पक्षाची उमेदवारी घ्यायची, हे प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यावर ठरवायचे, असा इरादा काठावरील इच्छुकांचा आहे. ऐनवेळी बंडखोरी करून सुरक्षित प्रभागातून निवडून येण्याचे डावपेच काहींनी आखले आहेत.

मागील वेळेस भाजपला बहुमत

महापालिकेच्या मागील म्हणजे २०१७च्या निवडणुकीत भाजपने १२८ पैकी ७७ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते. राष्ट्रवादीला ३६ जागा, तर शिवसेना नऊ, अपक्ष पाच, मनसे एक अशा जागा होत्या.

काँग्रेसला एकही जागा मिळाली  नव्हती. या निकालाने भाजपने पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवडवर मजबूत पकड सिद्ध केली होती. गेल्या काही वर्षातील घडामोडींमुळे समीकरणे बदललेली आहेत. 

Web Title: pimpari-chinchwad news for whom will the ward structure of the Municipal Corporation be complementary and for whom detrimental?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.