नियमित देखभाल,दुरुस्ती नसल्याने इमारती जीर्ण; पोलिस कुटुंबीयांची शासकीय वसाहतीकडे पाठ

By नारायण बडगुजर | Updated: July 18, 2025 14:53 IST2025-07-18T14:51:52+5:302025-07-18T14:53:07+5:30

- नियमित देखभाल,दुरुस्ती नसल्याने इमारती जीर्ण; पोलिस कुटुंबीयांची शासकीय वसाहतीकडे पाठ

pimpari-chinchwad news buildings are dilapidated due to lack of regular maintenance and repairs; Police families move to government colonies | नियमित देखभाल,दुरुस्ती नसल्याने इमारती जीर्ण; पोलिस कुटुंबीयांची शासकीय वसाहतीकडे पाठ

नियमित देखभाल,दुरुस्ती नसल्याने इमारती जीर्ण; पोलिस कुटुंबीयांची शासकीय वसाहतीकडे पाठ

पिंपरी : भोसरीतील इंद्रायणीनगर पोलिस वसाहतीतील इमारती जिर्ण झाल्याने पोलिसांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे १७६ घरांपैकी केवळ ४१ सदनिकांमध्ये कुटुंबे वास्तव्यास आहेत. तब्बल १३५ घरे वापराविना आहेत.

इंद्रायणीनगर वसाहतीत चार मजली १६ इमारती आहेत. यातील एक इमारत पोलिस अधिकाऱ्यांसाठी आहे; मात्र केवळ तीन कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. वापराविना पडून असलेल्या घरांमध्ये कबुतरांनी घाण केली आहे. नियमित साफसफाई होत नसल्याने कचरा आणि दुर्गंधी आहे.
 
देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष

पोलिस वसाहतींमधील इमारतींची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे; मात्र दुरुस्ती होत नाही. याबाबत सातत्याने तक्रारी करण्यात येत आहेत. केवळ तात्पुरती डागडुजी करण्यात येते.

पाण्याच्या टाक्यांना गळती

इमारतींवरील पाण्याच्या टाक्यांना गळती लागली आहे. हे पाणी इमारतीच्या भिंतींमधून पाझरत घरांमध्ये येते. इमारत क्रमांक आठवरील बाकीच्या गळतीमुळे इमारतीच्या भिंतीवर शेवाळे झाले आहे.
 
वापराविना घरांमुळे दुरवस्था

इमारतींमधील १३५ घरांची साफसफाई होत नाही. त्यामुळे उंदीर व कबुतरांचा वावर वाढला आहे. परिणामी घाण होऊन इमारत अधिक जीर्ण होत आहेत.
 
चेंबर तुंबून घाण पाणी रस्त्यावर

वसाहतीमधील चेंबर सातत्याने तुंबतात. त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर येते. अशा चेंबरची दुरुस्ती करूनही समस्या सुटलेली नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच महापालिका देखील जबाबदारी झटकत आहेत. समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी पोलिस कुटुंबीयांकडून होत आहे.

माझे कुटुंब २००९ पासून चौथ्या मजल्यावर राहत होतो. गळती होत असल्याने छताची खूप वेळा डागडुजी केली. मात्र, त्यानंतरही गळती थांबली नाही. त्यामुळे आता तळमजल्यावरील घरात राहायला आलो आहे. - सीताराम भवारी, पोलिस उपनिरीक्षक
 
इमारतींमधील बहुतांश घरे वापराविना पडून आहेत. त्यामुळे इमारतीच्या देखभाल, दुरुस्तीला अडचणी येत आहेत. यातून येथे कचरा साचून दुर्गंधीचाही त्रास आहे. - प्रतिमा शिखरे, रहिवासी
 
घरातील टॉयलेट नादुरुस्त झाले आहे. अनेकदा दुरुस्त करूनही उपयोग झाला नाही. त्यामुळे आम्हाला दुसऱ्या घरातील टॉयलेट वापरावे लागत आहे. - जयश्री कांबळे, रहिवासी

Web Title: pimpari-chinchwad news buildings are dilapidated due to lack of regular maintenance and repairs; Police families move to government colonies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.