जुन्नर : जुन्नर तालुक्यातील हडसर किल्ल्यावर दुर्गसंवर्धनात सापडलेल्या तोफेची निर्मिती इसवी सन १५९० मध्ये फारुकी राज्यकर्त्यांनी मध्य प्रदेशमधील अशीरगड किल्ल्यावर केल्याचे तोफेवरील फारशी लेखाचे वाचन केल्यानंतर स्पष्ट झाले आहे. प्रा. राजेंद्र जोशी, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे येथे प्रा. राजेंद्र जोशी यांनी संशोधन लेख प्रसिद्ध केला आहे.
हडसर गडावर गेली आठ वर्षे मरहट्टे सह्याद्रीचे दुर्गसंवर्धन संस्था, शिवाजी ट्रेल दुर्गसंवर्धन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली संवर्धन कार्य करीत आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये कमानी टाकेसंवर्धन करण्यास सुरुवात केलेली. हे करीत असताना दुर्गसंवर्धन कार्यात एकूण तीन तोफा सापडल्या होत्या. त्यातील दोन सुस्थितीत, तर एक तुटलेली होती. तुटलेल्या तोफेला एकसंघ करीत तिन्ही तोफांना सागवानी तोफगाडे बसवले होते. गेली कित्येक वर्षे चिखल-मातीत असल्यामुळे तिच्यावर गंज चढलेला होता. पावसाळ्याआधी तोफेची डागडुजी करीत असताना संस्थेच्या दुर्गसंवर्धकांना एक लेख निदर्शनास आला. प्रथमदर्शी तो उर्दू किंवा फारशी असेल, असा अंदाज आला. दुर्गसंवर्धक विनायक खोत यांना दाखविला. त्यानंतर तो फारशी आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आणि त्याचे वाचन करण्यासाठी प्रा. राजेंद्र जोशी (भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे) यांना याबाबत कल्पना दिली.
तोफेवर कोरलेला फारसी भाषेतील तीन ओळींचा शिलालेख अलीकडेच राजेंद्र जोशी यांच्याकडून वाचण्यात आला असून, तो इ.स. १५९०-९१ (हिजरी ९९८)चा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तोफ फारुकी घराण्यातील आदिलशाह (वडील– मुबारकशाह, आजा– आदिलशाह) यांच्या आदेशाने तयार करण्यात आली होती. ही तोफ मूलतः मध्य प्रदेशमधील अशीरगड किल्ल्यावर तयार झाली होती. मलिक हसन बिन मुहम्मद वली मुहम्मद हे तिचे अभियंते होते, असा उल्लेख लेखात स्पष्ट आलेला आहे.
संस्थेच्या म्हणण्यानुसार, ‘हा शोध केवळ इतिहास नव्हे, तर आमच्या संवर्धनाच्या कार्याची मोठी ऐतिहासिक पावती आहे. - अमोल ढोबळे, दुर्गसंवर्धक