कडाचीवाडी येथे मोर व लांडोराची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 19:51 IST2018-05-16T19:51:57+5:302018-05-16T19:51:57+5:30
शेती व जंगल परिसर असल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर मोरांची संख्या आहे.

कडाचीवाडी येथे मोर व लांडोराची शिकार
चाकण : कडाचीवाडी ( ता.खेड ) परिसरात सुकल्या डोंगरावर मंगळवारी ( दि.१५ ) मोर व लांडोराची शिकार करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना सकाळच्या प्रहरी फिरण्यासाठी जाणारे माजी उपसरपंच बाळासाहेब कड व अशोक काशिनाथ कड, अनिता झिंजुरके यांनी निदर्शनास आणून दिली.
सुकल्या डोंगरावर शेती व जंगलचा परिसर असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर मोरांची संख्या आहे. रात्रीच्यावेळी जाळे लावून शिकार करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मोरांची उपटलेली पिसे व इतर मांस याठिकाणी पडले होते. सकाळच्या वेळी डोंगरावर फिरायला जाणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच या डोंगरावर काही सागाची झाडेही तोडण्यात आल्याचे आढळले आहे. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी आदिती कोदे व वनपाल प्रदीप कासारे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अशा प्रकारच्या राष्ट्रीय पक्षी असलेल्या प्राण्यांची शिकार होणे, ही बाब अतिशय गंभीर असून वनविभागाने याबाबत उपाययोजना करण्याची व शिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज असल्याचे माजी उपसरपंच बाळासाहेब कड यांनी सांगितले.