- हिरा सरवदेपुणे : प्रभागात प्रभावी कामे करू न शकलेल्या आणि मतदारांमध्ये नाराजी असलेल्या महापालिकेच्या विसर्जित सभागृहातील तब्बल ५३ माजी नगरसेवकांना भाजपने उमेदवारी नाकारत घरचा रस्ता दाखवला आहे. निवडणुकीच्या रिंगणात केवळ ४६ माजी नगरसेवकांना पुन्हा उतरवले आहे. उमेदवारी कापलेल्या किंवा आरक्षणामुळे अडचण झालेल्या २० माजी नगरसेवकांच्या घरात नातेवाइकांना उमेदवारी देण्यात आली आहे. असे असले तरीही भाजपने घरातील कोणीही नगरसेवक नसलेल्या तब्बल ९९ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेल्या पुणे शहरात मागील बारा ते चौदा वर्षांत झालेल्या विविध निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळत आहे. राज्यातील सत्ता मिळाल्यानंतर भाजपने २०१७ च्या महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग रचनेचा अवलंब करत महापालिकेची सत्ता हस्तगत केली. त्या निवडणुकीत पुणेकरांनी भाजपच्या पारड्यात ९७ नगरसेवक टाकले, त्यानंतर दोन नगरसेवकांची भर पडली. त्यामुळे सभागृह विसर्जित होताना भाजपची नगरसेवक संख्या ९९ होती.
सभागृहाची मुदत संपल्यानंतर मागील पावणे चार वर्षे महापालिकेत प्रशासन राज असून महापालिकेची रखडलेली निवडणूक न्यायालयाच्या निर्णयानुसार होत आहे. मागील निवडणुकीतील यशाचा विचार करून भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने मुंबई सोडून राज्यातील सर्व महापालिकांची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे भाजपमध्ये दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, उद्धवसेनेसह विविध पक्ष व संघटनांच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि इच्छुकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परिणामी महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत निवडून आलेल्या माजी नगरसेवकांसह जवळपास अडीच हजार इच्छुकांनी भाजपकडे उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळेल, यासाठी उमेदवारी यादीची प्रतीक्षा होती. परंतु भाजपने उमेदवार यादी जाहीर न करताच, थेट एबी फॉर्म देऊन उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच गुलदस्त्यात होते.
मात्र, आता उमेदवारीचे गणित उलगडले आहे. भाजप नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या विसर्जित सभागृहातील ९९ पैकी ५३ माजी नगरसेवकांचा पत्ता कट करण्यात आला आहे. या माजी नगरसेकांनी प्रभागात उठून दिसेल असे काम केले नाही, त्यामुळे त्यांच्याविषयी मतदारांमध्ये नाराजी असल्याचे भाजपकडून करण्यात आलेल्या विविध सर्व्हेमध्ये आढळून आले होते. त्यामुळे केवळ ४६ माजी नगरसेवकांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. उमेदवारी कापलेल्या किंवा आरक्षणामुळे अडचण झालेल्या २० माजी नगरसेवकांच्या घरातील व्यक्तींसह २० ते २२ आयारामांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच घरातील कोणीही नगरसेवक नसलेल्या तब्बल ९९ नवीन चेहऱ्यांनाही भाजपने संधी दिली आहे.
Web Summary : BJP denies tickets to 53 former corporators for Pune Municipal Corporation 2026 elections due to poor performance. 46 veterans return, kin of 20 get tickets. 99 fresh faces get a chance, reflecting a strategic shift and focus on new leadership.
Web Summary : पुणे महानगरपालिका 2026 चुनावों के लिए भाजपा ने खराब प्रदर्शन के कारण 53 पूर्व पार्षदों को टिकट नहीं दिया। 46 अनुभवी वापस, 20 के रिश्तेदारों को टिकट। 99 नए चेहरों को मौका, एक रणनीतिक बदलाव और नई नेतृत्व पर ध्यान केंद्रित किया गया।