पुणे - विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी आपले मतभेद विसरून पुन्हा एकत्र यावे, अशी मागणी दोन्ही गटातील नेत्यांकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या आई आणि सुप्रिया सुळे यांच्या काकी आशाताई पवार यांनी देखील शरद पवार आणि अजित पवार यांनी पुन्हा एकत्र यावे अशी प्रार्थना विठूरायाला केली होती.
आशाताईंनी व्यक्त केलेल्या या भावनांवर सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यामध्ये बोलताना माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. सुळे म्हणाल्या, “आशाताईंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या विषयावर सातत्याने चर्चा सुरू आहेत. पण मी एक लोकप्रतिनिधी आहे. वैयक्तिक भावनांवर बोलणे माझे काम नाही.”
त्याचवेळी सुळे यांनी पवार कुटुंबातील नातेसंबंधांवर देखील आपली भूमिका स्पष्ट केली. “माझ्या कुटुंबात कधीच अंतर नव्हते. मी नेहमीच आशाताईंना आईसमान मानते. तुम्हाला आठवत असेल, लोकसभेच्या निवडणुकीच्या दिवशी मतदान करून मी पहिल्यांदा आशा काकींच्या पाया पडायला गेले होते. त्यामुळे माझे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य मी कधीच गल्लत केले नाही,” असे त्यांनी नमूद केले.
सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेल्या या भूमिकेने पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येणार की नाही, याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ आमदार नरहरी झिरवाळ यांनी पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत नुकतेच एक वक्तव्य केले असून अजित पवार व शरद पवार यांनी एकत्र यावे यासाठी आपण शरद पवार यांच्या समोर लोटांगण घालणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत आता पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.