रेल्वेत प्रवाशांना जागेवरच मिळणार आवडीच्या हाॅटेलमधून जेवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:53 IST2025-12-17T11:52:24+5:302025-12-17T11:53:24+5:30
-आयआरसीटीसीकडून ई-केटरिंग सेवा सुरू

रेल्वेत प्रवाशांना जागेवरच मिळणार आवडीच्या हाॅटेलमधून जेवण
पुणे :रेल्वे प्रवासात प्रवाशांना आपल्या आवडीच्या किंवा नामांकित हाॅटेल, रेस्टाॅरंटमधून जेवण मागविण्यासाठी भारतीय रेल्वे केटरिंग व पर्यटन महामंडळ लिमिटेड (आयआरसीटीसी) ने ई-केटरिंग सेवा सुरू केली आहे. त्यामुळे यापुढे प्रवाशांना जागेवर बसून जेवणाची ऑर्डर करता येणार असून, प्रवाशांनी निवडलेल्या वेळेत जेवण आपल्या आसनावर पोहोचणार आहे.
रेल्वे प्रवासात एकवेळचे जेवण पार्सल आणले जाते, तर काही प्रवाशांना वेळेअभावी डबा आणणे शक्य होत नाही. त्यावेळी जेवण किंवा भूक भागेल असे खाण्यासाठी पदार्थ घ्यायचा म्हटल्यावर प्रवासी कोणत्या ब्रॅंडचे आहे, चांगले आणि स्वच्छ असेल का? जेवण केल्यावर त्रास तर होणार नाही ना? असे एक ना अनेक विचार डोक्यात येतात. त्यामुळे बाहेरील पदार्थ खाण्याचे टाळतात. विशेषत: लांब पल्ल्याच्या प्रवाशांत ही अडचण अधिक जाणवते. त्यावेळी माहितीतील किंवा नामांकित ब्रॅंड असलेल्या हाॅटेलचे पदार्थ असल्यावर प्रवासी खरेदी करत असल्याचे दिसून येते.
त्याच पार्श्वभूमीवर आयआरसीटीसीने प्रायोगिक तत्त्वावर ई-केटरिंग सेवा सुरू केली. त्यासाठी संकेतस्थळासह टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप आणि व्हाॅट्सॲपद्वारे ऑर्डर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. या सेवेमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान विश्वासार्ह ब्रँड्स आणि अधिकृत रेस्टॉरंट्समधून आपल्या पसंतीचे अन्न निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते. ही सेवा www.ecatering.irctc.co.in या संकेतस्थळावर, अधिकृत ‘फूड ऑन ट्रॅक’ मोबाईल ॲप, व्हाॅट्सॲप ऑर्डरिंग सेवा या 91-8750001323 नंबरच्या माध्यमातून पूर्णपणे डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे.
प्री-पेड किंवा कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय :
प्रवाशांचा याला चांगला प्रतिसाद मिळत असून, आयआरसीटीसीने ही सेवा सक्षमपणे राबविण्यास सुरुवात केली असून, देशभरातील ३०० हून अधिक रेल्वे स्थानकांवर ही सेवा उपलब्ध असून त्यामध्ये भारतीय, दक्षिण भारतीय, चायनीज तसेच कॉन्टिनेंटल व इतर स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. त्यामध्ये नामांकित हाॅटेलचा समावेश आहे. समूहाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आयआरसीटीसीकडून ग्रुप ऑर्डर सुविधादेखील उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशांना आसन सोडण्याची गरज नाही. त्यांना जागेवर अधिकृत विक्रेत्यांकडून आणि आपल्या आवडीच्या हाॅटेलमधून स्वच्छ व दर्जेदार जेवण उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये प्रवाशांना ऑनलाईन प्री-पेड किंवा कॅश ऑन डिलिव्हरी हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.