नीरा नदीपात्रात मंगुर माशाची दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 23:23 IST2018-11-11T23:23:23+5:302018-11-11T23:23:44+5:30
मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न : इतर चवीष्ट माशांची उपलब्धता घटली

नीरा नदीपात्रात मंगुर माशाची दहशत
निमसाखर : येथील नीरा नदीपात्रामध्ये मंगुर जातीचा मासा सापडू लागला आहे, अशी माहिती मच्छीमारांनी दिली. मंगुर मासा इतर माशांना नष्ट करतो. बाजारात मंगुर मासा ग्राहक खरेदी करीत नाहीत. परिणामी मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. उजनीपाठोपाठ नीरा नदीपात्रातदेखील मंगुरची दहशत पसरली आहे.
निमसाखर (ता. इंदापूर) येथील व पळसमंडळनजीकच्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये साठलेल्या पाण्यात अनेक तरुण मासेमारी करून आपली उपजीविका करीत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून नीरा नदीत मंगुर जातीचे मासे सापडत असल्यामुळे मरळ, तिलापी, रहु वामसह अन्य चवीष्ट माशांना निमसाखरकरांना मुकावे लागणार आहे. गावापासून सुमारे दोन किलोमीटरवर पळसमंडळ (माळशिरस) जवळ कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. सध्या नदीमध्ये पाणी असल्याने या भागातील तरुणांना मासेमारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. यापूर्वी या भागातील तरुण मासेमारी करीत असताना अठरा ते वीस किलोपर्यंतचे मासे या नीरा नदीमध्ये सापडले आहेत.
नदीत यापूर्वी रहू, कानस, तिलापी, खेकडे, वाम, मरळसह अन्य प्रकारचे मासे सापडत असल्याचे या भागातील मच्छीमारांनी सांगितले. यंदा मात्र नीरा नदी काही दिवसच वाहिल्याने मासे कमी प्रमाणत मिळत आहेत. यातूनही काही प्रमाणात मासे सापडत आहेत. मात्र सगळ्यात जास्त बंदी असलेला मंगुर जातीचा मासा सापडत आहे. हा मंगुर जातीचा मासा आरोग्यासाठी त्रासदायक, घातक असल्यामुळे नागरिक हा मासा विकत घेत नाहीत. याचबरोबर हा मासा इतर माशांना गिळंकृत करत असल्यामुळे इतर जातीचे मासे मिळणे दुरापास्त झाले आहे. ज्याप्रमाणे बंदी असलेल्या मंगुर जातीचा मासा उजनी धरणात अथवा भिगवण भागातील तळ्यांमध्ये सापडतो. याप्रमाणे हा मासा नीरा नदीतही सापडत असल्यामुळे या माशाची दहशत आता नीरा नदीतही जाणवू लागली आहे. यामुळे ग्रामीण भागातील मत्स्यव्यवसाय करणारे मच्छीमार मासे मिळत नसल्याने हवालदिल झाले आहेत. यामुळे बेरोजगारीची कुºहाड या तरुणांवर पडली तर आहेच; परंतु या भागातील खवय्येसुद्धा चांगलेच धास्तावले असल्याची या परिसरातून चर्चा आहे.
मंगुर जातीचा मासा आरोग्यासाठी त्रासदायक असल्यामुळे नागरिकांकडून मागणी नसते.
मंगुर मासा इतर माशांना गिळंकृत करीत असल्यामुळे इतर जातीचे मासे मिळणे दुरापास्त
उजनी धरण किंवा भिगवण भागातील तळ्यांबरोबरच नीरा नदीतही आढळामुळे समस्येत वाढ