पुणे: पुण्यातील मोक्याच्या आरोपीला दोन वर्षांनी पुणेपोलिसांच्या बेड्या ठोकल्या आहेत. खुनाच्या गुन्ह्यात मोक्का लागलेला असून दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनीअटक केली. सूर्यकांत उर्फ पंडित कांबळे असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या कडून २ पिस्तूल आणि ४ जिवंत काडतुसे पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आहेत. कांबळे हा सराईत गुंड असून तो पुण्यातील पंडित गँगचा म्होरक्या देखील आहे. अशी माहिती संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आरोपीवर पुण्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. अटक केलेल्या आरोपीवर शहरातील चार पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. पूर्व वैमनस्यातून या टोळीने १५ ऑगस्ट २०२३ च्या रात्री मंगला चित्रपटगृहाच्या मागे नितीन म्हस्केचा निर्घुण खुन केला होता. या गुन्ह्यात शिवाजीनगर पोलिसांनी १७ आरोपींना अटक केली होती. या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या गँगचा म्होरक्या पंडित कांबळे हा फरार झाला होता.
मुंडक्याचा फुटबॉल खेळला होता
पंडित कांबळे हा अट्टल गुन्हेगार असून त्याने यापूर्वी २ खुनाचे व इतर ४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. येरवड्यातील नदीच्या बेटावर खुन केल्यानंतर त्याचे मुंडके धडावेगळे करुन त्याने मित्राबरोबर मुंडक्याचा फुटबॉल खेळला होता. त्याच्या पंडीत टोळी व यल्ल्या टोळी अशा दोन टोळ्या असून दोन्ही टोळ्यांचा तो प्रमुख आहे. ताडीवाला रोड, बंडगार्डन परिसर, दत्तवाडी, दांडेकर पुल परिसरात त्यांची दहशत आहे.
पंडित कांबळे अखेर ताब्यात
पंडित गँगचा म्होरक्या अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील तपास पथक ११ मार्च रोजी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिसांना अशी खबर मिळाली की, खुनाच्या गुन्ह्यातील कांबळे हा दांडेकर पुल, दत्तवाडी परिसरात येणार आहे. बातमीची खातरजमा केल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांकडून सापळा रचण्यात आला. दांडेकर पुल येथील दीक्षित बागेसमोर तो आला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गेल्या १९ महिन्यांपासून फरार असलेल्या काळाबाबत चौकशी केल्यावर त्याने गोवा, कर्नाटक तसेच महाराष्ट्राच्या सीमेवरील गावात राहत असल्याचे सांगितले. तो मोबाईल वापरत नसल्याने त्याचा सुगावा लागत नव्हता. तसेच एका राज्यातून दुसर्या राज्यामध्ये जाऊन वाटसरुंना आडवून त्यांच्याकडून मोबाईल घेऊन नातेवाईकांशी संपर्क करत असे. त्यामुळे पोलिसांची वेळोवेळी दिशाभूल होत होती.