पाकिस्तानने आपली छेड काढली; त्यांना धडा शिकवलाच पाहिजे, रामदास आठवलेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 13:42 IST2025-04-28T13:41:17+5:302025-04-28T13:42:11+5:30
एवढ्या वर्षांत भारतीय सेना आणि आतंकवादी यांचा संघर्ष होता, पण पर्यटकांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ, या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो

पाकिस्तानने आपली छेड काढली; त्यांना धडा शिकवलाच पाहिजे, रामदास आठवलेंची मागणी
पिंपरी : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानने आता आपली छेड काढली आहे. पाकिस्तानला आता धडा शिकवलाच पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. रामदास आठवले हे पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
आठवले म्हणाले, “काश्मीरमध्ये पर्यटकांवर झाला हल्ला आहे, एवढ्या वर्षांत भारतीय सेना आणि आतंकवादी यांचा संघर्ष होत होता; पण पर्यटकांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ, या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो. पाकिस्तानसोबत चांगले संबंध व्हावेत, असे आमची इच्छा होती, एक वर्षे चर्चाही झाली; पण पाकिस्तानच्या वतीने सतत भारतावर हल्ले होत राहिले. पाकिस्तानने आता आपली छेड काढली आहे. पाकिस्तानला आता धडा शिकवलाच पाहिजे.
आम्हाला एक मंत्रिपद द्यावं
रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडियाला (आरपीआय) एक विधान परिषद आणि एक मंत्रिपद द्यावं, तसेच महामंडळ, अनेक जिल्हा आणि तालुका पातळीवर पदे आहेत, ती मिळावी, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी आरपीआयच्या याद्या मागवल्या आहेत, अशी माहिती आठवले यांनी दिली.
महापालिका निवडणुका डिसेंबर अखेर...
आठवले म्हणाले, “महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यांच्या निवडणुका डिसेंबरअखेर किंवा जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक भाजपा, शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार आणि आरपीआय यांनी एकत्र निवडून लढविण्याची सूचना आहे. महापालिका निवडणुकीत आरपीआयला ७ ते ८ जागा मिळाव्यात, अशी आमची मागणी आहे.
...तर त्यांना पर्यायी जागा द्यावी
आठवले म्हणाले, “महापालिका शहरातील धार्मिक स्थळांवर कारवाई करत आहे. मात्र, महापालिकेने त्या धार्मिक स्थळांचा अभ्यास करावा, ती धार्मिक स्थळे जर जुनी असतील, तसे त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांना संरक्षण द्यावे. सरकारच्या कामात जर या धार्मिक स्थळांची अडचण येत असेल, तर त्यांना पर्यायी जागा द्यावी. नागरिकांनीही त्याला सहकार्य करावे.