“मोदींनीच कारवाई करावी” भाजप खासदारावर वीर पत्नी प्रगती जगदाळे संतापल्या
By किरण शिंदे | Updated: May 25, 2025 15:27 IST2025-05-25T15:26:58+5:302025-05-25T15:27:38+5:30
रामचंद्र जांगरा यांनी केलेले हे विधान अत्यंत अमानवी आणि असंवेदनशील आहे. अतिरेकी अचानक आमच्यावर चाल करून आले.

“मोदींनीच कारवाई करावी” भाजप खासदारावर वीर पत्नी प्रगती जगदाळे संतापल्या
पुणे - पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या प्रगती जगदाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली असून, भाजप खासदार रामचंद्र जांगरा यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
या हल्ल्यानंतर भाजपचे खासदार रामचंद्र जांगरा यांनी दिलेल्या विधानाचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. जांगरा यांनी आपल्या विधानात म्हटले होते की, “हल्ल्यावेळी पर्यटक महिलांनी हात जोडून भीक मागण्यापेक्षा लढा दिला असता, योग्य ठरले असते.” या वक्तव्यावर प्रगती जगदाळे यांनी प्रत्युत्तर दिले.
त्या म्हणाल्या, “रामचंद्र जांगरा यांनी केलेले हे विधान अत्यंत अमानवी आणि असंवेदनशील आहे. अतिरेकी अचानक आमच्यावर चाल करून आले. त्यांनी आम्हाला धर्म विचारला आणि आमच्या पतींवर गोळ्या झाडल्या. त्यांच्या हातात रायफल्स होत्या. अशा शस्त्रांसमोर कोणतीही स्त्री किंवा पुरुष वीरगतीने लढू शकत नाही. आम्ही त्या क्षणी भीती आणि धक्क्यात होतो.”
तसेच, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही विनंती केली आहे. “पंतप्रधान मोदींनी आमचे दुःख ओळखले, ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे त्यांनी बदला घेतला, ज्यामुळे आम्हाला थोडं समाधान मिळालं. पण, आता त्यांच्या पक्षातील खासदारानेच अशा प्रकारची वक्तव्ये करून आमच्या जखमांवर मीठ चोळले आहे.”
प्रगती जगदाळे यांनी पंतप्रधान मोदींना थेट मागणी केली आहे की, “रामचंद्र जांगरा यांच्या विरोधात कठोर कारवाई करा. आम्ही वीर पत्नी आहोत की नाही, हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही. आमच्या वेदना आणि स्थिती समजून घेण्यासाठी जांगरा यांनी आमच्या घरी येऊन आमची अवस्था प्रत्यक्ष पाहावी.”