भोर: म्हसरबुदुक ता भोर गावातील शिंदेवस्ती येथील जाईबाई शिंदे या वृद्ध महिलेला सकाळी ९ वाजता पॅरालिसिसचा झटका आला. माञ रस्ता नसल्याने महिलेला डालात टाकून तीन किलोमीटर चिखल तुडवत पायपीट करत तब्बल दिड तासांनी म्हसरबुदुक गावात आणले तिथुन खाजगी गाडीने भोर रुग्णालयात आणले. स्वातंत्र्याला ७८ वर्ष झाली तरीही अदयाप दुर्गम डोंगरी गावात रस्त्याच्या सुविधा नाहीत. ही शोकांतिका आहे.
म्हसरबुदुक गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर डोगरात २५ घरांची शिंदेवस्ती आहे. येथील म्हसर बु ग्रामपंचायतीचे सदस्य दिनेश बबन शिंदे यांची आज्जी जाईबाई कोंडीबा शिंदे (वय ९० वर्ष) यांना सकाळी ९ वाजता पॅरालिसिसचा झटका आला. माञ रस्ता कच्चा असून पावसाळ्यात वस्तीत कोणत्याही प्रकारचे वाहन जात नाही. त्यामुळे शिंदेवाडी ते म्हसरबुद्रुक गावापर्यंत ३ किलोमीटर अंतर असल्यामुळे नागरिकांनी सदर वृद्ध महिलेला डालात ठेवून भर पावसात चिखल तुडवत दिड तासाने गावात आणले. माञ गावात दवाखाना नसल्याने खासगी गाडीने महिलेला भोर रुग्णालयात आणावे लागले.
स्वातंत्र्याला ७८ वर्ष झाली तरीही तालुक्यातील भाटघर धरण निरादेवघर भागातील दुर्गम डोंगरी काही गावांना, रायरेश्वर किल्ला वरची धानवली अशा अनेक ठिकाणी रस्त्याची सुविधा नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात कोणीही आजारी पडल्यास, सर्पदंश झाल्यास, महिला प्रसुतीवेळी डाल किंवा डोलीत टाकून पायपीट करत रुग्णाला आणावे लागते. यात रुग्णाचा जीव जाण्याची भिती आहे. माञ याकडे प्रशासानाचे दुर्लक्ष होत आहे. म्हसरबुद्रुक येथील शिंदेवस्ती येथे २५ घरे असून कच्चा रस्ता असुन दर पावसाळ्यात येथील रस्ता बंद होतो. त्यामुळे पावसाळ्यात दळणवळणाची सुविधा नसल्याने कोणीही आजारी पडल्यास रुग्णाला घेऊन पायपीट करावी लागते. त्यामुळे सदरचा रस्ता करावा अशी मागणी म्हसरबुदुकचे सरपंच एकनाथ म्हसुरकर यांनी केली आहे.