ओतूर पोलिसांचा गुटखा तस्करांवर 'मोठा आघात'! ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त; खिरेश्वर शिवारात पहाटे रंगला थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 13:02 IST2025-12-22T13:02:37+5:302025-12-22T13:02:46+5:30
गोपनीय माहितीनुसार ओतूर पोलीस स्टेशनच्या पथकाने खिरेश्वर परिसरात सापळा रचला होता.

ओतूर पोलिसांचा गुटखा तस्करांवर 'मोठा आघात'! ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त; खिरेश्वर शिवारात पहाटे रंगला थरार
ओतूर (जुन्नर):जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलिसांनी बेकायदेशीर गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई करत तस्करांचे कंबरडे मोडले आहे. २१ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास खिरेश्वर गावच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल ४८ लाख ४० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
पहाटेच्या अंधारात पोलिसांचा छापा मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ओतूर पोलीस स्टेशनच्या पथकाने खिरेश्वर परिसरात सापळा रचला होता. पहाटेच्या वेळी एका मोठ्या कंटेनरमधून पिकअप गाडीमध्ये प्रतिबंधित गुटख्याचा साठा भरला जात होता. पोलिसांनी अचानक छापा टाकताच तस्करांची एकच पळापळ झाली. यामध्ये तीन आरोपींना पोलिसांनी जागीच पकडले, मात्र कंटेनर चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार होण्यात यशस्वी झाला.
जप्त केलेला मुद्देमाल:
प्रतिबंधित गुटखा: २८,४०,४०० रुपये (बाजारभावानुसार)
वाहनं (कंटेनर व पिकअप): २०,००,००० रुपये
एकूण कारवाई: ४८,४०,४०० रुपये
आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध कठोर पाऊल गुटख्याच्या माध्यमातून तरुणाईला व्यसनाच्या खाईत ढकलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यामुळे ओतूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता या रॅकेटमधील मुख्य सूत्रधाराचा शोध घेत असून, फरार चालकाचाही शोध सुरू आहे.