कोरेगाव भीमा : वाडा-पुनर्वसन (ता. शिरूर) येथील दोघींना धडा शिकवायचा म्हणून शनिवारी (दि. २२) एका परप्रांतीयाने तीन लहानग्यांचे अपहरण केले. यातील सात वर्षीय मुलीला बहुळ (ता. खेड) येथील एका निर्जन विहिरीत टाकून दिले, तर उर्वरित दोघांना चाकण-शिक्रापूर रस्त्यावर सोडून दिले. याबाबतची खबर शिक्रापूरपोलिसांना कळताच शिक्रापूर, शिरूर, रांजणगावसह अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले व पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या पथकाने अल्पवयीन मुलीचा मृतदेह बहुळ येथील विहिरीतून ताब्यात घेतला, तर यातील आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.
शनिवारी (दि. २२) दुपारी चारच्या सुमारास वाडा पुनर्वसन (कोरेगाव भीमा) येथून तीन लहानग्यांचे अपहरण झाल्याची खबर मिळाली. या खबरीची खातरजमा करताच पोलिसांनी स्वतंत्र तपास पथकाची नियुक्ती करून अपहृत बाळांचा शोध सुरू केला. यातील तीन व चार वर्षीय मुले ही चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील बहुळ (ता. खेड) येथे असल्याचे समजल्यावर हे शोध पथक दोन्ही मुलांपर्यंत पोहोचले व दोघांनाही ताब्यात घेतले. दरम्यान, या तीनही मुलांचे अपहरण केलेल्या व्यक्तीबद्दलचा संशय मयत गायत्रीची आई वीणा रणजित रविदास (वय ३४, रा. वाडा-पुनर्वसन, कोरेगाव भीमा, ता. शिरूर, मुळ रा. झारखंड) यांनी व्यक्त केला. त्यावरून बबन यादव याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने वरील तीन बालकांचे अपहरण केल्याची कबुली दिली आणि यापैकी दोघांना बहुळमध्ये सोडले, तर गायत्रीला विहिरीत टाकल्याची माहिती दिली. त्यानुसार सर्च ऑपरेशन करून बहुळ येथील विहिरीतून मयत गायत्रीचा मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिली. दरम्यान, बबन यादव (४२, रा. वाडा पुनर्वसन, कोरेगाव भीमा, ता. शिरूर, मुळ रा. उत्तर प्रदेश) यालाही अटक केली. प्राथमिक माहितीनुसार आरोपीने हे कृत अनैतिक कृत्याला विरोध केल्याने केल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.
म्हणून केले अपहरण अपहृत तिनही बालके, त्यांचे कुटुंबीय आणि आरोपी परप्रांतीय असून, मृत गायत्रीच्या मावशीशी आरोपीचे अनैतिक संबंध होते. मात्र, त्याला गायत्रीची आई आणि इतर कुटुंबीयांचा विरोध असल्याने या सर्वांना धडा शिकवायचा म्हणून वरील तीनही बालकांचे आपण अपहरण केल्याचे आणि गायत्रीला विहिरीत टाकल्याचे आरोपीने पोलिसांना प्राथमिक तपासात सांगितले.