जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
By नितीन चौधरी | Updated: April 20, 2025 07:21 IST2025-04-20T07:16:00+5:302025-04-20T07:21:47+5:30
Jamin Mojani marathi: पुनर्मोजणीतील नकाशे जीआयएस प्रणालीशी पडताळणी करून संकेतस्थळावर टाकले जाणार आहेत. त्याशिवाय अंतिम निकाल देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
- नितीन चौधरी, पुणे
जमीन मोजणी प्रकरणांवर हरकत घेण्यात आल्यानंतर आता पुनर्मोजणी करण्यापूर्वी मोजणी अर्जदार, सहधारक, लगतधारक तसेच हिस्सेदारांची सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मोजणीप्रकरणी प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच या हरकतीवर जिल्हा अधीक्षकांकडे करण्यात आलेले द्वितीय अपील अंतिम असणार आहे. त्यामुळे सरकार स्तरापर्यंत जाणाऱ्या अपिलांना चाप बसणार आहे, तर पुनर्मोजणीतील नकाशे जीआयएस प्रणालीशी पडताळणी करून संकेतस्थळावर टाकले जाणार आहेत. त्याशिवाय अंतिम निकाल देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
भूकरमापक अथवा परिरक्षण भूमापक या अधिकाऱ्यांमार्फत मोजणी केल्यानंतर ती मान्य नसल्यास भूमी अभिलेख उपअधीक्षक किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे पुनर्मोजणी अर्ज करता येईल.
आता भूमी अभिलेख विभागाने पुनर्मोजणी अर्थात प्रथम अपील दाखल झाल्यानंतर मोजणी अर्जदारासह सहधारक, लगतधारक, हिस्सेदारांना नोटीस बजावून सुनावणी घेतली जाणार आहे. त्याशिवाय पुनर्मोजणी होणार नाही.
नकाशे जीआयएस प्रणालीसोबत तपासणार
पुनर्मोजणी झाल्यानंतर पूर्वीची मोजणी आणि नंतरची मोजणी याचे नकाशे जीआयएस प्रणालीशी जोडून त्याची आवृत्तीनिहाय पडताळणी केली जाणार आहे.
हे नकाशे महाभूमी पोर्टलवर अपलोड करून सर्व संबंधितांना त्याची ऑनलाइन नोटीस दिली जाणार आहे. नकाशे अपलोड केल्याशिवाय अंतिम निकाल देता येणार नाही.
कुठे होईल दुसरे अपील?
या मोजणीवरही आक्षेप असल्यास द्वितीय अपील जिल्हा भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षकांकडे करता येणार आहे. पूर्वी उपअधीक्षक, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख संचालक व राज्य सरकारकडे अपील दाखल केले जात होते. नव्याने काढलेल्या परिपत्रकात आता दोनच अपील करता येणार आहे. जिल्हा अधीक्षकांनी दिलेला निर्णय यानंतर अंतिम असणार आहे.