‘आॅनलाईन पाकिटमारी’
By Admin | Updated: March 21, 2015 23:10 IST2015-03-21T23:10:10+5:302015-03-21T23:10:10+5:30
तुमच्या मोबाईलवर अचानक एक फोन येतो...अमुक तमुक बॅँकेचा अधिकारी बोलत असल्याचे सांगितले जाते...तुमच्या खात्याची माहिती विचारली जाते...

‘आॅनलाईन पाकिटमारी’
पुणे : तुमच्या मोबाईलवर अचानक एक फोन येतो...अमुक तमुक बॅँकेचा अधिकारी बोलत असल्याचे सांगितले जाते...तुमच्या खात्याची माहिती विचारली जाते...तुम्हीही विश्वास ठेवून माहिती देता...आणि दुसऱ्याच मिनिटाला तुमच्या खात्यामधून हजारो रुपये लंपास होतात...ही आहे तुमचा खिसा कापण्याची नवी पद्धती. सुशिक्षित भामटे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन शेकडो मैलांवरुन खात्यातील रकमा अगदी सहज लंपास करीत आहेत. पोलिसांच्या सायबर शाखेसह पोलीस ठाण्यांमध्ये या ‘आॅनलाईन पाकिटमारी’च्या शेकडो तक्रारी प्राप्त होत आहेत. वर्षाकाठी पाच कोटींपेक्षा अधिक रकमा चोरल्या जात असल्याची पोलिसांची माहिती आहे.
४बॅँकिं ग क्षेत्रामध्ये अधिकाधिक सुलभता आणि कमी वेळात व्यवहार पूर्ण करण्यासाठी जवळपास सर्वच आघाडीच्या बॅँकांनी आॅनलाईन बँकिंग सुविधा सुरू केलेल्या आहेत. यामध्ये नेट बॅँकिंग, मोबाईल बॅँकिंगचा समावेश आहे. मोबाईल, ई-मेलद्वारेही बॅँकांमधील खाते वापरता येत असल्यामुळे खातेदार या सेवांचा वापर करीत आहेत.
४परंतु, या तंत्रज्ञानाचा गैरफायदा सुशिक्षित भामट्यांकडून घेण्यात येत आहे. सुशिक्षित तरुण, तरुणी, नोकरदार विशेषत: व्यावसायिक आणि आयटीक्षेत्रामध्ये काम करणारेही या फसव्या फोन कॉल्सला आणि ई-मेल्सला बळी पडत आहेत. बॅँक खात्यांमधून पळवलेले पैसे वेगवेगळ्या खात्यांवर फिरतात.
४एकाच खात्यातील रक्कम विविध खात्यांवर आॅनलाईन वर्ग केली जाते. बऱ्याचदा ही खाती बनावट नावांची असतात. फसवणुकीच्या या गुन्ह्यांमध्ये आरोपी मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. परंतु पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे अशा फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे.
४या आर्थिक गुन्ह्यांचे केंद्र उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यांमध्ये आहे. तसेच अनेकदा बॅँकेमध्ये खाते उघडताना दिलेली माहिती चुकीची असते. पत्त्यांचे पुरावे बनावट असतात. तो पत्ताच अस्तित्वात नसतो.
मोबाईल फोन कॉल्स
खातेदाराच्या मोबाईलवर आलेला कॉल उचलल्यानंतर खातेदाराच्या खात्याची इत्थंभूत माहिती दिली जाते. खातेदाराचे पूर्ण नाव, पत्ता सांगितला जातो. क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड अथवा डेबिट कार्ड बंद पडल्याचे सांगून ते अपडेट करण्यासाठी त्याचा पासवर्ड आणि कार्डाच्या पाठीमागे असलेला तीन आकडी क्रमांक विचारुन घेतला जातो. ही माहिती दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच खात्यावरुन हजारो रुपये लंपास केले जातात. अनेकदा या माहितीचा वापर करुन मोबाईल कंपन्यांची हजारो रुपयांची बिले परस्पर भरली जातात.
बनावट ई-मेलद्वारे गंडा
मोठमोठ्या रकमांचे व्यवहार करणाऱ्या नोकरदारांपासून ते व्यावसायिकांपर्यंत अनेक जण ई-मेल बॅँकिंगचा वापर करतात. बॅँकेला दिलेला ई-मेल आयडी आरोपी मिळवतात. त्यावर बॅँकांच्या ई-मेल आयडीशी मिळत्या जुळत्या मेल आयडीवरून मेसेज पाठवले जातात. बॅँकेच्या विविध खात्यांची माहिती देण्याच्या बहाण्याने खात्याची माहिती विचारली जाते. अनेकदा बॅँकांचे लोगो वापरुन बनावट संकेतस्थळ सुरु केले जाते. त्याच्या लिंक्स ई-मेलवर पाठवल्या जातात. त्यावर क्लिक करताच नेट बॅँकिंगचा खातेदाराचा सर्व डाटा आपोआप या भामट्यांच्या संगणकावर जातो. खातेदाराचे खातेही हॅक केले जाते.
लॉटरी, बक्षीस लागल्याचे ई-मेल्स
विदेशातील हजारो डॉलर्सचे बक्षीस अथवा लॉटरी लागल्याचे मेसेज मोबाईल आणि ई-मेलवर पाठवले जातात. त्या मोबाईल क्रमांक अथवा ई-मेलवर संपर्क साधल्यानंतर खातेदाराला लॉटरी/बक्षिसाची रक्कम मिळवण्यासाठी प्रक्रिया शुल्क भरायला सांगितले जाते. कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसापायी लाखो रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये भरुन अनेक जण कफल्लक झाल्यानंतर पोलिसांचे उंबरे झिजवायला सुरुवात करतात.
मोबाईल हॅक केला जातो
मोबाईल आणि नेट बॅँकिंगसाठी खातेदाराने त्याचा मोबाईल क्रमांक बॅँकेमध्ये नोंदवलेला असतो. हा मोबाईल क्रमांक हॅक करून बंद पाडला जातो. आरोपी हा मोबाईल बंद पडल्याची तक्रार मोबाईल कंपन्यांकडे करतात. त्याच क्रमांकाचे दुसरे सीमकार्ड मिळवतात. मग आरोपीकडे असलेल्या मोबाईल सीमकार्डवर बॅँकेच्या व्यवहारांचे मेसेज यायला सुरुवात होते. याचा फायदा उचलत आरोपी खात्यांमधील लाखो रुपये सहजगत्या लंपास करतात. डेक्कन पोलिसांनी नुकताच अशा स्वरुपाचा गुन्हा दाखल केला आहे. सीएच्या फर्मला या भामट्यांनी ७८ लाखांना टोपी घातली होती.