पुणे : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत गेल्या काही दिवसांपासून गणेश मंडळांमध्ये वाद सुरू आहे. यंदा मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांची संख्या कमी करण्याची मागणी काही मंडळांकडून जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर गणेश मंडळे एकत्र येऊन कोणता निर्णय घेतात, याकडे ढोल-ताशा पथकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गणेश मंडळांनी ‘एक पथक, एक मंडळ’ असा निर्णय घेतल्यास त्याला आमची सहमती राहील, अशी भूमिका ढोल-ताशा महासंघाने जाहीर केली आहे.
पुण्यातील १०० हून अधिक गणेश मंडळांनी यंदा विसर्जन मिरवणूक सकाळी सात वाजता काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पोलिस प्रशासनाने गणेश मंडळांशी चर्चा करण्यासाठी विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत मंडळांनी आपली भूमिका मांडली. विशेषत: मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांची संख्या जास्त असल्याने मिरवणूक उशिरा संपते, असा मुद्दा काही मंडळांनी उपस्थित केला. यावर उपाय म्हणून ‘एक मंडळ, एक ढोल-ताशा पथक’ अशी मागणी मंडळांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, ढोल-ताशा महासंघाने या मागणीला प्रत्युत्तर देताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महासंघाने प्रसिद्धीपत्रक जारी करून सांगितले की, ढोल-ताशा पथके पुण्याच्या गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे मंडळांसमोरील पथकांची संख्या कमी करण्याच्या मागणीवर विचार करण्यापूर्वी सर्व गणेश मंडळांशी सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे. महासंघाने मंडळांना एकत्र येऊन परस्पर संमतीने तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे, तसेच ढोल-ताशा पथके ही पुण्याच्या गणेशोत्सवाची शान आहे. कायद्याच्या चौकटीत उभे करून एक प्रकारे ढोल-ताशा कला संपवू पाहत नाही, याचा विचार करण्याची गरज असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे.
गणेश मंडळे ‘एक पथक, एक मंडळ’ असा निर्णय घेतील याला आम्ही संमती दर्शवू. त्यामुळे सर्व मंडळांच्या बैठकीत ठरेल त्याबाबत सर्व पथके सहकार्य करतील, तसेच सर्व गणेश मंडळांना हा निर्णय उत्सवाच्या पूर्वी घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. - पराग ठाकूर, अध्यक्ष, ढोल-ताशा महासंघ