लोणावळा ट्रिप शेवटची ठरली! पाच मित्रांसोबत फिरायला गेला अन् गोंदियाचा आयुष पाण्यात बुडाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 09:01 IST2026-02-18T09:01:29+5:302026-02-18T09:01:56+5:30
एकोले गावातील लोटस पॉईंट येथे तरुणाचा बुडून मृत्यू, सुमारे दीड तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी ५.३० वाजता आयुषचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

लोणावळा ट्रिप शेवटची ठरली! पाच मित्रांसोबत फिरायला गेला अन् गोंदियाचा आयुष पाण्यात बुडाला
पुणे - मावळ तालुक्यातील एकोले गावाजवळील लोटस पॉईंट येथे मंगळवारी (१७ फेब्रुवारी) एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आयुष हरिणखेडे (वय २१), सध्या कात्रज येथे वास्तव्यास असून मूळ गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी होता. पुण्यातीलच एका खाजगी महाविद्यालयात तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता. आपल्या पाच मित्रांसोबत आयुष एकोले येथे फिरण्यासाठी आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आयुषला व्यवस्थित पोहता येत नसताना तो पाण्यात उतरला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. दुपारी सुमारे १२.३० वाजता या घटनेची माहिती बचाव पथकाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच स्थानिक गावकरी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी ४ वाजता सर्व बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आणि शोधकार्य सुरू करण्यात आले.
सुमारे दीड तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी ५.३० वाजता आयुषचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मात्र परिसरातील अवघड आणि डोंगराळ वाटेमुळे मृतदेह बाहेर आणणे मोठे आव्हान ठरले. सर्व अडचणींवर मात करत बचाव पथकांनी रात्री सुमारे ९ वाजता मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.