विहिरीचे काम करताना पाण्यात पडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 19:15 IST2018-06-06T19:15:17+5:302018-06-06T19:15:17+5:30
विहिरीत थांबून आडवे बोअर घेण्याच्या मशिनला ग्रीस लावण्याचे काम करत होता. यावेळी अचानक तो पाण्यात पडला.

विहिरीचे काम करताना पाण्यात पडून एकाचा मृत्यू
लोणी काळभोर : विहिरीत आडव्या बोअरचे काम सुरु असताना पाण्यात पडल्याने झालेल्या दुर्घटनेत एक तरुण मृत्यूमुखी पडला असल्याची दुदैैवी घटना थेऊर फाटा ( ता. हवेली ) येथे घडली. या संदर्भात किरण अंकुश साळुंखे (वय २४, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, मुळ गाव अर्जुननगर,ता. करमाळा, जि. सोलापूर) याने फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी (दि.५ जून) दुपारी घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण सदाफुले असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याची विहिरीत आडवे बोअर मारण्याची मशिन आहे. या मशिनवर किरण साळुंखे काम करत आहे. दि. ५ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता थेऊर फाटा येथील एका विहिरीत आडवे बोअर घेण्याचे काम सुरू होते. या वेळी किरण व प्रविण दोघेही विहिरीत उतरले होते. लाईट गेल्यामुळे किरण विहिरीच्या बाहेर आला होता. परंतु, प्रविण विहिरीत थांबून आडवे बोअर घेण्याच्या मशिनला ग्रीस लावण्याचे काम करत होता. यावेळी अचानक तो पाण्यात पडला. प्रविण पाण्यात पडल्याचा आवाज ऐकून किरणने विहिरीत पाहिले असता त्याला प्रविण पाण्यात पडलेला दिसला. किरणने इतर लोकांच्या मदतीने प्रविणला विहिरी बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. लोणी काळभोर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.