‘एक भाषा, एक धर्म’ अराजक निर्माण करेल - फादर दिब्रिटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 03:17 AM2019-09-27T03:17:57+5:302019-09-27T03:18:05+5:30

साहित्य परिषदेतर्फे सत्कार; सीमेवरील शत्रूपेक्षा घरातील शत्रूंची चिंता जास्त

'One language, one religion' will create chaos - Father Dibrito | ‘एक भाषा, एक धर्म’ अराजक निर्माण करेल - फादर दिब्रिटो

‘एक भाषा, एक धर्म’ अराजक निर्माण करेल - फादर दिब्रिटो

Next

पुणे : ‘ज्या देशात लोक एकमेकांचा द्वेष करतात, त्या देशाला भवितव्य नसते. सीमेवरील शत्रूपेक्षा मला घरातील शत्रूंची जास्त चिंता वाटते. मते न पटणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. मात्र, विरोधाच्या नावाखाली होणारी झुंडशाही आपल्याला मान्य आहे का,’ असा सवाल उपस्थित करत ‘हुकूमशहाचा उदय होतो, तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने येतात. एक भाषा, एक धर्म देशात अराजक निर्माण करेल,’ अशा शब्दांत ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी खडे बोल सुनावले.

संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल फादर दिब्रिटो यांचा सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. या वेळी कार्यकारी विश्वस्त उल्हास पवार, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे उपस्थित होते. पं. वसंतराव गाडगीळ यांनी दिब्रिटो यांना संस्कृतमधून शुभेच्छा दिल्या. दिब्रिटो यांच्या निवडीला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर मसाप परिसरात पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला. माधवराव पटवर्धन सभागृहात प्रवेश देण्यापूर्वी प्रत्येकाची तपासणी केली जात होती. दिब्रिटो म्हणाले, ‘आपण एकमेकांचे धर्म साहित्य वाचत नाही, केवळ दोष दाखवतो. धर्मात परिवर्तन घडत आहे, मानवता रुजत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. मिशनरी म्हणजे धर्मांतर असा गैरसमज पसरवला जात आहे. सक्तीने धर्मांतराला चर्चचा विरोधच आहे. संविधानाच्या चौकटीत राहून हवा तो धर्म स्वीकारण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. कोणताही धर्म नाही तर भारत टिकला पाहिजे. माणूस हा चिंतनाचा विषय करू या.’

देशाची संस्कृती बहुमुखी आहे. विरोध करणारे संस्कृतीची चेष्टा करत आहेत. ज्याला वर्तमानाचे यथार्थ आकलन होते, तोच भूमिका घेऊ शकतो. धर्माने आणि धर्मसंस्थांनी मानवतेला कायम तुरुंगात डांबले. धर्म जितकी माणसे मारतो तितकी आजवर कोणीही मारलेली नाहीत. - डॉ. रावसाहेब कसबे

Web Title: 'One language, one religion' will create chaos - Father Dibrito

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.