कोरोनाच्या नियमभंगप्रकरणी प्रशांत जगतापांसह दीडशे जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:08 IST2021-06-21T04:08:15+5:302021-06-21T04:08:15+5:30
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी फिजिकल डिस्टन्सिंग पालन न करता अटी व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी शहराध्यक्ष ...

कोरोनाच्या नियमभंगप्रकरणी प्रशांत जगतापांसह दीडशे जणांवर गुन्हा
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी फिजिकल डिस्टन्सिंग पालन न करता अटी व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
त्यात प्रामुख्याने शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक नीलेश निलम, बाळासाहेब बोडके, सरचिटणीस रोहन पायगुडे, युवक अध्यक्ष महेश हांडे यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. सकाळी लोकांना लॉकडाऊन पुन्हा लावण्याची तंबी दिल्यानंतर कोरोना नियमांचे उल्लंघन होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ खंत व्यक्त केली. यावरून अजित पवार यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. याबाबत शनिवारी पोलिसांनी चुप्पी साधली होती. व्हिडीओ आणि फोटो पाहून कारवाई करू, असे सांगण्यात येत होते. मात्र, सोशल मीडियावर होत असलेली टिकाटिप्पणीनंतर पोलीस कार्यरत झाले. त्यानंतर रविवारी सकाळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवक अध्यक्ष महेश हांडे यांनी कार्यक्रमाकरीता ध्वनीक्षेपणाची परवानगीसाठी अर्ज केला होता. त्यात सध्याचे कोविड संसर्गाबाबत शासनाने दिलेल्या अटी व शर्तींचे तंतोतत पालन करून सामाजिक सुरक्षित अंतर व सर्व जण मास्क लावतील, असे या अर्जात नमूद केले होते. त्यानुसार महेश हांडे यांना योग्य त्या अटी व शर्तीवर परवानगी देण्यात आली होती. तसेच दक्षता घेण्याबाबत नोटीस बजावली होती. हांडे यांनी कार्यक्रमाला १० ते १५० जणांच्या उपस्थितीत उद्घाटनाला असतील असे तोंडी कळविले होते. प्रत्यक्षात अंदाजे ४०० ते ५०० पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
------------
अनेक नियमांचे नाही पालन
पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फिजिकल डिस्टसिंगचे पालन न करता कार्यक्रमामध्ये गर्दी केली होती. त्यापैकी काही लोकांनी तोंडावर मास्क लावलेले नव्हते. नोटीसप्रमाणे व शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे त्यांनी पालन न करता उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कलम १८८, २६९, २७० राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व महाराष्ट्र कोविड १९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार दिनेश वीर यांनी फिर्याद दिली आहे.